India vs Pakistan War: पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही हादरले!
India vs Pakistan War: पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये अति. जिल्हा विकास आयुक्तांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.

India vs Pakistan War: पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये अति. जिल्हा विकास आयुक्तांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. राजौरीमध्ये अति.जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापांचा मृत्यु झाला. राज कुमार थापा हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत देखील सहभागी झाले होते.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ट्विट करत म्हणाले की, राजौरीहून आलेली ही धक्कादायक बातमी आहे. आपण जम्मू-काश्मीर प्रशासन सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यात फिरत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते. आज पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष्य करत केलेल्या गोळीबारात अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर हल्ला झाला, ज्यामध्ये आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त श्री. राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झाला. या भयानक जीवितहानीबद्दल मला धक्का आणि दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो...असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.
राजकुमार थापा यांनी बजावली महत्वपूर्ण भूमिका-
राजकुमार थापा हे जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त (ADDC) म्हणून कार्यरत होते. राजकुमार थापा यांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दुर्दैवाने, 10 मे 2025 रोजी, राजौरी जिल्ह्यातील त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एक तोफगोळा लागल्यामुळे राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे दोन कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
पाकिस्तानकडून 26 शहरांना लक्ष्य-
पाकिस्तानने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या 4 राज्यांमधील 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले. श्रीनगर विमानतळावरही हल्ला झाला. उत्तरेत जम्मूमधील बारामुल्ला ते पश्चिमेत गुजरातमध्ये भुज दरम्यान पाकिस्तानने 26 शहरांना लक्ष्य केलं. नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले करत पाकिस्तानने भारतीय लष्कराला डिवचण्याचं काम केलं. मात्र काही वेळातच भारतीय लष्कराने पाकला जशास तसं उत्तर दिलं. पाकिस्तानमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली.
























