Unemployment : रोजगार देण्याचं नव्या वर्षात सर्वात मोठं आव्हान! डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर वाढला, 16 महिन्यांतील उच्चांक
Unemployment Rate India: नवीन वर्षात देशासमोर अनेक आव्हाने असतील. यामध्ये वाढत्या बेरोजगारीच्या दरावर (Unemployment Rate India) नियंत्रण ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
India Unemployment Rate Jumps : आज आपण नवीन वर्षाचं स्वागत केलं. सर्वत्र नव्या वर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. अनेकांनी नवनवीन संकल्प केले. काहींनी नवीन वर्षातील आव्हानांवर देखील चर्चा केली. निश्चितपणे नवीन वर्षात देशासमोर अनेक आव्हाने असतील. यामध्ये वाढत्या बेरोजगारीच्या दरावर (Unemployment Rate India) नियंत्रण ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने बेरोजगारीबाबत काही आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 मध्ये 8.3% पर्यंत वाढला आहे, जो गेल्या 16 महिन्यांतील सर्वोच्च आहे.
CMIE च्या आकडेवारीनुसार देशातील शहरी बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 8.96% वरून 10.09% पर्यंत वाढला आहे, तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 7.55% वरून 7.44% वर आला आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, आपल्या देशात बेरोजगारीचा दर वाढत आहे, जरी हा दर वाढलेला दिसत असला तरी तो तितका वाईट नाही, कारण कामगार भागिदारीच्या दरामध्ये (labour participation rate) चांगली वाढ झाली आहे. जी 2014 मध्ये 40.48 टक्के झाली आहे. डिसेंबरमध्ये हा गेल्या 12 महिन्यांतील उच्चांक आहे.
नव्या वर्षात सर्वात मोठे आव्हान रोजगार निर्मितीचे
महेश व्यास यांनी म्हटलं आहे की, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबरमध्ये देशातील रोजगाराचा दर 37.1% इतका वाढला आहे, जो जानेवारी 2022 नंतरचा उच्चांक होता.
जुलै-सप्टेंबर तिमाहीत दर कमी करण्यात आला
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) द्वारे संकलित केलेल्या आणि नोव्हेंबरमध्ये जारी केलेल्या त्रैमासिक आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर या तिमाहीत बेरोजगारीचा दर 7.2% पर्यंत घसरला आहे, जो मागील तिमाहीत 7.6% होता.
हरियाणात सर्वाधिक बेरोजगारी दर
डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर हरियाणामध्ये 37.4% पर्यंत वाढला, त्यानंतर राजस्थान 28.5% आणि दिल्ली 20.8% वर पोहोचला आहे, हे CMIE च्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.
येत्या 2024 मधील लोकसभा निवडणुकांपूर्वी देशातील महागाई रोखणे आणि रोजगार मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या लाखो तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे हे मोदी सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. येत्या निवडणुकांमध्ये बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. मोदी सरकारला या आव्हानाचा सामना या निवडणुकांमध्ये करावा लागणार आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये देखील बेरोजगारीच्या मुद्द्यावर अनेकदा भाष्य केलं होतं.