India Paksitan War Drone Attack: पाकिस्तानचे 5 ड्रोन पुन्हा भारतात शिरले; चंदीगढमध्ये सायरन वाजले, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना, नेमकं काय घडलं?
India Paksitan War Drone Attack: पाकिस्तानकडून सोडण्यात येणारे ड्रोन्स भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

India Paksitan War Drone Attack: भारतीय सैन्याने काल रात्रभर पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले (India Paksitan War Drone Attack) केल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती अजूनही जिरलेली नाही. भारतीय वायूदलाने काल रात्रभर लाहोर, इस्लामाबाद यासह प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले करुन अनेक भाग बेचिराख केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला आहे. पंजाबच्या चंदीगढ परिसरात पाकिस्तानी सैन्याचे पाच ड्रोन शिरले आहेत. त्यापूर्वी चंदीगढमध्ये सायरन वाजतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. चंदीगढमध्ये आतापर्यंत पाच ड्रोन शिरल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानकडून सोडण्यात येणारे ड्रोन्स भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तानने आणखी किती ड्रोन्स चंदीगढमध्ये पाठवले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, काल रात्री झालेल्या हल्ल्यात भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानी लष्कराचे 60 ड्रोन्स आणि 45 क्षेपणास्त्रं पाडली होती. पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन वाजले आहेत. त्यामुळे सर्वांनी घरातच राहावं, आणि बाहेर बाल्कनीत थांबू नये अशी सूचना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
पाकिस्तानी सैन्याकडून कालपासून भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ले-
पाकिस्तानी सैन्याकडून काल रात्रीपासून भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ले चढवले जात आहेत. त्यासाठी रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचे बहुतांश हवाई हल्ले परतावून लावले आहेत. यामध्ये एस 400 एअर डिफेन्स सिस्टीम आणि एल 70 गन, Zu-23mm या अँटी एअरक्राफ्ट मशीनगन्स आणि शिल्का यंत्रणेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची सध्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी बैठक सुरु आहे. यानंतर भारत पाकिस्तानवर सर्वात मोठा आणि निर्णायक हल्ला करु शकतो. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बारामुल्ला भागात पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा सीमारेषेवर हल्ला सुरु केला आहे. बारामुल्ला परिसरात पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्तीवर गोळीबार केला आहे. या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून लवकरच चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले-
भारतातल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले आहेत. भारताच्या एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टममुळे पाकिस्तान तोंडावर पडला. पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांवर केलेला हल्ला भारताच्या एस 400 या एअर डिफेन्स सिस्टीमने उधळून लावलाय. काल रात्री वायुदलाने पाकिस्तानातून येणारा हल्ला एस 400 या एअर डिफेन्स सिस्टीमने नेस्तनाबूत केला. एअर डिफेन्स सिस्टीम असलेल्या भारताच्या युनिटचं नाव सुदर्शन चक्र असं आहे. भारताने नेमकं सुदर्शन चक्र पाकिस्तानवर सोडत पाकिस्तानी हल्ला निष्प्रभ केला. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. भारताच्या एस 400 या सिस्टीमने पाकिस्तानातून आलेली सर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन उडवून लावले.
























