दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
India Job Crisis : भारताने अमेरिकेच्या बदलत्या व्यापार धोरणांशी योग्य पद्धतीने जुळवून घेतलं नाही तर अनेक क्षेत्रातील 'व्हाईट-कॉलर जॉब कट्स' दिसू शकतात असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : भारतातील मध्यमवर्गीय रोजगाराला मोठा फटका बसू शकतो, असा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे. देशातील रोजगार बाजारामध्ये सध्या ज्या प्रकारचे बदल होत आहेत, त्यातून सुमारे 2 कोटी नोकऱ्या पुढील काही वर्षांत गमावल्या जाऊ शकतात, असे विश्लेषकांचे मत आहे. विशेष म्हणजे हा धक्का आर्थिक मंदीमुळे नव्हे, तर जागतिक व्यापारातील अस्थिरता, AI (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वेगाने वाढणारा वापर आणि कंपन्यांनी खर्च कपातीसाठी केलेल्या मोठ्या बदलांमुळे येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Marcellus Investment Managersचे संस्थापक आणि वरिष्ठ अर्थतज्ज्ञ सौरभ मुखर्जी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमधून यासंबंधी इशारा दिला. भारताने अमेरिकेच्या बदलत्या व्यापार धोरणांशी योग्य पद्धतीने जुळवून घेतलं नाही तर IT, बँकिंग, मीडिया, ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये व्यापक प्रमाणात 'व्हाईट-कॉलर जॉब कट्स' दिसू शकतात.
Indian Jobs At Risk : AI, ऑटोमेशन आणि गिग इकॉनॉमीचा वाढता प्रभाव
तज्ज्ञांच्या मते, AI आणि जनरेटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या वापरामुळे कंपन्यांना कमी कर्मचार्यांमध्ये अधिक काम करता येत आहे. विशेषतः IT आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रात हजारो नोकऱ्या कंत्राटी किंवा प्रोजेक्ट-आधारित (Gig Economy) भूमिकांमध्ये बदलत आहेत.
भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांनी मागील एक वर्षात नवीन भरतींना ब्रेक, कर्मचार्यांचे पुनर्संरचना कार्यक्रम आणि काही विभागांचे ऑटोमेशन आक्रमक पद्धतीने सुरू केले आहेत. त्यामुळे पारंपरिक, स्थिर वेतनभोगी नोकऱ्यांचा पाया कमकुवत होत आहे.
Middle Class Job In Danger : मध्यमवर्गीय कुटुंबांवर कर्जाचा डोंगर
गृहकर्ज (Home Loan), वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जांचे प्रमाण गेल्या 5 वर्षांत प्रचंड वाढले आहे. नोकरी गमावण्याची भीती वाढल्यामुळे या कर्जांचा भार मध्यमवर्गीयांवर अधिकच ताण निर्माण करतो आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतात 'नोकरीची अनिश्चितता + वाढतं कर्ज + महागाई' यामुळे मिडल क्लास आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक अस्थिर स्थितीत आला आहे.
USA Tariff Global Trade Pressures : जागतिक व्यापार तणाव आणि अमेरिकेचे टॅरिफ धोरण
अमेरिकेने काही आयातीत वस्तूंवर धोरणात्मक टॅरिफ वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्याचा थेट परिणाम भारतातील उत्पादन, IT-सेवा निर्यात, आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर होऊ शकतो.
अमेरिकन व्यापार धोरण स्थिर नसेल, तर भारतातील लाखो नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Job Crisis Reasons & Impact : पुढील 2–3 वर्षे कठीण
विश्लेषकांचे अंदाज सांगतात की रोजगार क्षेत्रातील हा बदल जलद गतीने चालू राहील. पुढील 2-3 वर्षांत भारतातील मोठा हिस्सा Permanent Jobs वरून Contract, Gig Based Jobs कडे वळण्याची भीती आहे.
तथापि, कौशल्यवृद्धी (Upskilling), AI-आधारित नवीन क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे हेच पुढील काळातील सुरक्षिततेचे मार्ग आहेत.
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण व्हाव्यात यासाठी सरकार, उद्योग क्षेत्र आणि कौशल्य-विकास व्यवस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांची नितांत गरज आहे. अन्यथा, 2 कोटी नोकऱ्या धोक्यात येण्याचा इशारा वास्तवात बदलू शकतो आणि त्याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गालाच बसेल.
ही बातमी वाचा:
























