(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid 3rd Wave : देश करतोय सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना; शास्त्रज्ञांचा दावा
शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून असे लक्षात आले आहे की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन वाढत असल्याने डिसेंबरच्या मध्यापासून कोविड-19 ची तिसरी लाट भारतात आली आहे.
India currently facing 3rd Covid wave Said Scientists : भारतातील काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन वाढत असल्याने डिसेंबरच्या मध्यापासून कोविड-19 ची तिसरी लाट भारतात आली आहे. ही तिसरी लाट पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये जोर धरू शकते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), कानपूरच्या संशोधकांच्या टीमच्या नेतृत्वाखालील टीमने केलेल्या अभ्यासात गॉसियन वितरणाच्या मिश्रणावर आधारित सांख्यिकीय पद्धतीचा वापर केला. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेतील डेटा वापरून तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला होता. टीमने तिसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या विविध देशांच्या डेटा वापरला, त्यांच्या दैनंदिन केसेसच्या डेटाचे मॉडेलिंग केले आणि भारतातील तिसऱ्या लाटेचा परिणाम आणि टाइमलाइनचा अंदाज लावला.
"कोविड-19 ची भारतातील तिसरी लाट डिसेंबर 2021 च्या मध्यापासून सुरू होईल आणि फेब्रुवारी 2022 च्या सुरुवातीला प्रकरणे शिगेला जातील, असा अहवालात अंदाज लावण्यात आला आहे." असं गणित आणि सांख्यिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सुभ्रा शंकर धरल यांनी एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासात भारतात 6,317 नवीन कोविड केसेस आणि 318 मृत्यूची नोंद झाली आहे. ओमायक्रॉन रूग्ण संख्या 213 वर पोहोचली आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी (22 डिसेंबर) सांगितले. मृतांचा आकडा 4,78,325 वर पोहोचला आहे.
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, भारतात कोरोनाची तिसरी लाट "पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला" सुरू होणार आहे. तथापि, त्यांनी नमूद केले की आता देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असल्याने संसर्ग दर हा दुसर्या लाटेपेक्षा कमी असेल.
महत्त्वाच्या बातम्या :
Petrol-Diesel Price Today : देशात आजसाठी पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जारी; आजचे दर काय?
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा