बॅन्ड, बाजा, नाचगाणं आणि नुसता दंगा-धुडगूस; मुलीला पहिला स्मार्टफोन घेतल्यानंतर 'चहावाल्या'चं भन्नाट सेलिब्रेशन
तुझ्यासाठी स्मार्टफोन विकत घेतल्यानंतर ती बातमी आख्ख्या शहराला समजेल असं वचन या चहावाल्याने त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला दिलं होतं.
भोपाळ : आपल्या देशातील 'चहावाला' काय-काय करु शकतो याचा अंदाज काही लावता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्या लहानपणी चहा विकायचे. त्यांच्या या माहितीनंतर देशातल्या अनेक चहावाल्यांच्या गोष्टी चर्चेला आल्या. आता मध्य प्रदेशातील अशाच एका चहावाल्याचा भन्नाट किस्सा समोर आला आहे. तुला जर स्मार्टफोन विकत घेतला तर ती बातमी आख्ख्या शहराला समजेल असं वचन शिवपुरीच्या चहावाल्याने त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला दिलं होतं. मग स्मार्टफोन घेतल्यानंतर या चहावाल्याने चक्क बॅन्ड, बाजाच्या आणि नाचगाण्याच्या माध्यमातून हे सेलिब्रेशन केलं. आता या चहावाल्याची सर्वत्र चर्चा आहे.
मुरारी कुशवाह असं या चहावाल्याचं नाव असून तो शिवपुरी या ठिकाणी राहतो. त्याने त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला सांगितलं होतं की तिला जर स्मार्टफोन विकत घेऊन दिला तर ते संपूर्ण शहराला समजेल. आणि शेवटी त्याने ही गोष्ट खरी करुन दाखवली. आपल्या मुलीला स्मार्टफोन विकत घेऊन दिल्यानंतर या चहावाल्याने चक्क बॅन्ड बाजा सांगितला. त्यावर थिरकायला मित्रपरिवार गोळा केला. या चहावाल्याने आणि त्याच्या मित्रांनी या वरातीत नुसता दंगा-धुडगूस घातला. यावेळी फटाकेही मोठ्या प्रमाणात फुटले.
ही सगळी गोष्ट पाहताना सर्वांना असंच वाटत होतं की कुणाच्या तरी लग्नाची वरात चालली आहे. या चहावाल्याने त्याच्या घराला लायटिंगने सजवले. या सेलिब्रेशनमध्ये लहान मुलांनी चांगलाच दंगा घातल्याचं दिसत आहे. शराबी चित्रपटातील 'लोग कहते है मै शराबी हुँ' या गाण्याने तर या सेलिब्रेशनला चांगलाच रंग आल्याचं दिसत आहे. अनेकांनी चहावाल्याच्या या सेलिब्रेशनला त्यांच्या मोबाईलमध्ये कैद करुन ठेवलं.
चहावाल्याच्या या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मुलीने बापाला दारू बंद करण्याचा सल्ला दिला
या चहावाल्याला आधी दारुचं व्यसन होतं. पण त्याच्या या पाच वर्षाच्या मुलीने त्याला दारु सोडण्यासाठी सातत्याने विनवणी केली. बापाने दारु सोडावी आणि पैसे वाचवावेत असं ती म्हणायची. त्यानंतर या चहावाल्याने दारु सोडली आणि वाचलेल्या पैशातून त्याच्या मुलीला स्मार्टफोन घेऊन दिला.
महत्त्वाच्या बातम्या :