(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India-China Standoff | LAC वर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार: लष्कर प्रमुख
गेल्या काही महिन्यांपासून पूर्व लडाखच्या सीमेवर भारत-चीन दरम्यान तणाव सुरु आहे. या पार्श्वमूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) यांनी भारतीय लष्कर केवळ पूर्व लडाखच नव्हे तर संपूर्ण LAC वरील कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असल्याचं सांगितलं.
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून पूर्व लडाखच्या सीमेवर भारत आणि चीन दरम्यान तणाव सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय लष्कर केवळ पूर्व लडाखच नव्हे तर संपूर्ण LAC वरील कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असल्याचं सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले की, "चीनच्या लष्करासोबत भारताची कोअर कमांडर स्तरावरील 8 व्या फेरीची बैठक संपली आहे. आता आम्ही नवव्या फेरीच्या बैठकीची वाट पाहत आहोत. चर्चेच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा निघेल अशी आशा आहे."
India China Border Dispute: चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश; भारतीय लष्कराने घेतलं ताब्यात
कोणत्याही परिस्थितीत माघार नाही लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले की, "लडाख तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत सैन्य माघार घेतले जाणार नाही. या बाबतीत सरकारचे निर्देश साफ आहेत. थंडी असो वा उष्णता, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करता चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असेल."
लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे पुढे म्हणाले की, "चीनच्या हालचालीवर भारतीय लष्कर सातत्याने लक्ष ठेवून आहे. तिथली परिस्थिती लक्षात घेता स्थानिक अधिकाऱ्यांनाही निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे परिस्थितीनुसार स्थानिक अधिकारी निर्णय घेऊ शकतात. आम्ही आमच्या लष्कराची स्थिती भक्कम केली आहे."
पाकिस्तानवरील विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले की, "दहशतवादी कारवायांचा वापर पाकिस्तान त्यांच्या सरकारी धोरणांच्या स्वरुपात करते. आमच्याकडे प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे, त्यानुसार ठिकाण आणि वेळ आम्ही ठरवणार. त्याचसोबत आमचा प्रतिहल्ला हा जबरदस्त असेल. कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. आमच्या जवानांचे मनोबल उच्च आहे त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही."
LAC वर भारत आणि चीनदरम्यान स्थिती नाजूक बनली आहे. दोन्ही देशांचे सैनिक शंभर मीटरपेक्षा कमी अंतरावर तैनात असल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही क्षणी वाद होऊ शकतो.
या भागात पुन्हा एकदा गलवान खोऱ्यासारखी परिस्थिती होऊ नये यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत स्वत: लडाखच्या दौऱ्यावर आहेत. भारताने या ठिकाणच्या आपल्या सैनिकांच्या संख्येत वाढ केली आहे.
Goa Shipyard | गोवा शिपयार्ड भारतीय लष्करासाठी बनवणार 12 गस्ती नौका