India China Border Tension : भारत-चीन सैनिकांची कोर-कमांडर स्तरावरील चर्चेनंतर गोगरा पेट्रोल पॉइंट -17 ए मधून माघार
भारत आणि चीन यांच्यात शनिवारी झालेल्या 12 व्या लष्करी चर्चेचा परिणाम म्हणून दोन्ही बाजूंनी (भारत-चीन) पूर्व लडाखमधील गोगरा भागातून सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे.
India China Border Tension : पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी नुकत्याच झालेल्या कोर कमांडर-स्तरीय चर्चेच्या अनुषंगाने दोन्ही देशांचे सैनिक गोगरा पेट्रोल पॉइंट -17 ए मधून मागे हटले आहेत. दोन्ही देशांमधील लष्करी स्तरावरील चर्चेच्या 12 व्या फेरीत यावर सहमती झाली. याबाबतची माहिती भारतीय लष्कराने शुक्रवारी दिली.
लष्कराच्या वतीने असे सांगण्यात आले की, भारत आणि चीन यांच्यात शनिवारी झालेल्या 12 व्या लष्करी चर्चेचा परिणाम म्हणून दोन्ही बाजूंनी (भारत-चीन) पूर्व लडाखमधील गोगरा भागातून सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. सर्व तात्पुरत्या संरचना, दोन्ही पक्षांनी बांधलेल्या इतर पायाभूत सुविधा मोडून टाकल्या आहेत. भारत आणि चीनच्या वतीने टप्प्याटप्प्याने गोगरामध्ये सैन्य तैनात करणे थांबवले आहे. करारात हे सुनिश्चित केले की प्रदेशातील वास्तविक नियंत्रण रेषेचे (LAC) दोन्ही बाजूंनी काटेकोरपणे पालन केले जाईल आणि त्याचा आदरही केला जाईल.
As per agreement reached during Corps Commander talks, both sides (India-China) ceased forward deployments in PP-17 in phased, coordinated & verified manner. Disengagement process was carried out over 4-5 Aug'21. Both sides are now in their respective permanent bases: Indian Army pic.twitter.com/ihNRWKbLNh
— ANI (@ANI) August 6, 2021
भारतीय लष्कराने म्हटले आहे की, भारत आणि चीन दोघांनीही चर्चेला पुढे नेण्यासाठी आणि पूर्व लडाखमधील LAC सह उर्वरित समस्या सोडवण्यास पुढाकार घेतला आहे. भारतीय लष्कर, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) सोबत राष्ट्राची सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पूर्व लडाखमध्ये LAC च्या बाजूने शांतता राखण्यासाठी वचनबद्ध आहे.
गेल्या बैठकीत चीनने पँगोंग-त्सो परिसर वगळता इतर कोणत्याही क्षेत्रातील वाद नाकारला होता. मात्र भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर लष्करी कमांडर्सच्या बैठकीवर सहमती झाली. यानंतर, शनिवारी झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांचे सैनिक गोगरा पेट्रोल पॉइंट -17 ए वरून मागे हटले आहेत.
LAC वाद मिटवण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात सातत्याने मुत्सद्दी आणि लष्करी पातळीवर चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांचे सैन्यही काही ठिकाणाहून परतले आणि सैनिक जुन्या ठिकाणावर गेले. पण, हॉट स्प्रिंग आणि गोगरामध्ये अजून एकमत झाले नव्हते. गेल्या वर्षी जूनमध्ये दोन्ही देशांमध्ये हिंसक चकमकी झाल्या होत्या. ही घटना अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच घडली होती. या घटनेत भारतीय सैन्याचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे सुमारे 40 सैनिक मारले गेले होते अशी माहिती समोर आली होती. मात्र, चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूची आकडेवारी जगाला कधीच दिली नाही.