आता रेल्वेचं तिकीट रद्द झालं तर चिंता नको; त्याच पैशात मिळणार विमानाचं तिकीट!
रेल्वेने प्रवास करायचा म्हटलं की तिकीट कन्फर्म होईपर्यंत प्रत्येकाला चिंता लागून असते. मात्र, आता तसं होणार नाही.
मुंबई : लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कारण रेल्वेचं तिकीट कन्फर्म झालं नाही, तर रेल्वेच्याच तिकीट दरात प्रवाशांना विमान प्रवास करता येणार आहे. तीन मित्रांनी स्थापन केलेला स्टार्टअप 'रेलोफाय'चा हा उपक्रम आहे. यासाठी रेलोफाय 7 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. यामुळे दरवर्षी कोट्यवधींच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.
लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करायचा म्हटलं की आपल्याला हमखास वेटिंगचं तिकीट मिळतं. अनेकदा हे तिकीट कन्फर्म न झाल्याने एकतर धक्के खात प्रवास करावा लागतो, किंवा बेत रद्द करण्याची वेळ आपल्यावर येते. मात्र आता रेल्वेचं तिकीट कन्फर्म झालं नाही तर प्रवाशांना विमानाने प्रवास करता येणार आहे. तेसुद्धा रेल्वेच्याच तिकीट दरात.
तुम्ही रेल्वेचं तिकीट काढलं की 'रेलोफाय' अॅपवर जाऊन तुमचा पीएनआर नंबर टाकायचा आणि ट्रॅव्हल गॅरंटी फी म्हणजेच रजिस्ट्रेशन फी भरायची. त्यानंतर प्रवासाच्या दिवशी जर तुमचं तिकीट कन्फर्म झालं नाही, तर रेल्वेच्या तात्काळ तिकीटाइतके पैसे भरायचे. यानंतर पुढच्या 24 तासांत तुम्ही विमानाने तुमचं गाव गाठू शकता. यामध्ये फायदा असा आहे की शेवटच्या दिवशी तुम्ही विमानाचं तिकीट काढायला गेलात, तर त्याचे दर गगनाला भिडणारे आणि सर्वसामान्यांना न परवडणारे असतात. त्यामुळे रेल्वेच्या तिकीटदरात जर तुम्हाला विमान प्रवास करायला मिळत असेल तर काय वाईट आहे?
मुंबईतल्या रोहन देढिया, रिषभ संघवी आणि वैभव सराफ या आयआयटी, आयआयएममधून शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणांची ही संकल्पना आहे. भारतात दररोज जवळपास 50 हजार रिकाम्या सीट घेऊन विमानं उडतात. याच सीट जर कमी पैशात रेल्वे प्रवाशांना मिळाल्या, तर त्यातून रेल्वे प्रवाशांचाही फायदा होईल आणि विमान कंपन्यांचाही, या संकल्पनेतून हे अॅप तयार करण्यात आलं आहे.
या रेलोफाय ऍपबाबत रेल्वे प्रवाशांनीही सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कारण तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे अनेकांना आपले गावी जाण्याचे, फिरायला जाण्याचे बेत रद्द करावे लागतात. ते यापुढे होणार नाहीतच, शिवाय सर्वसामान्य प्रवाशांना विमान प्रवासाचीही संधी मिळेल.
Railway Travel | राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, 200 विशेष गाड्यां मधूनच प्रवासाची मुभा