(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोणी भारताला छेडले तर सोडणार नाही, संरक्षणमंत्र्यांचा चीनला सज्जड दम
Rajnath Singh: सतत सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या चीनला भारताच्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक संदेश दिला आहे.
Rajnath Singh: सतत सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या चीनला भारताच्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक संदेश दिला आहे. ''राजनाथ सिंह म्हणाले की, भारताला कोणी नुकसान पोहोचवले तर त्याला सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक शक्तिशाली देश म्हणून उदयास येत आहे. भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या तयारीत आहे.'' सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाला संबोधित करताना सिंह यांनी अमेरिकेलाही संदेश दिला की, भारत "झिरो-सम गेम"च्या कूटनीतीवर मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवत नाही. 'झिरो-सम गेम' ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये एका बाजूचे नुकसान दुसऱ्या बाजूच्या नफ्या इतके असते. भारत आणि अमेरिका यांच्यात वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित 'टू प्लस टू' मंत्रीस्तरीय चर्चेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते.
सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने गुरुवारी त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना सिंह यांनी चीनच्या सीमेवर भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचा उल्लेख केला. संरक्षणमंत्री म्हणाले की, 'त्यांनी (भारतीय सैनिकांनी) काय केले आणि आम्ही (सरकारने) कोणते निर्णय घेतले, हे मी उघडपणे सांगू शकत नाही. पण मी खात्रीने सांगू शकतो की (चीनला) संदेश पाठवला आहे की, जर कोणी भारताला छेडले तर भारत त्याला सोडणार नाही.
5 मे 2020 रोजी पॅंगॉंग लेक परिसरात हिंसक चकमकीनंतर भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान सीमेवरील संघर्ष सुरू झाला. 15 जून 2020 रोजी गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या चकमकीनंतर वाद वाढला. या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. मात्र चीनने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. युक्रेन युद्धामुळे रशियावर अमेरिकेच्या दबावाचा कोणताही थेट संदर्भ न देता सिंह म्हणाले की, भारताचा "झिरो-सम गेम" मुत्सद्देगिरीवर विश्वास नाही. ते म्हणाले की, भारताचे कोणत्याही एका देशाशी चांगले संबंध असतील तर याचा अर्थ असा नाही की, त्याचे इतर कोणत्याही देशाशी संबंध बिघडतील.
ते म्हणाले, “भारताने अशा प्रकारची मुत्सद्देगिरी कधीच स्वीकारली नाही. भारत हा (अशा प्रकारची मुत्सद्देगिरी) कधीही स्वीकारणार नाही. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये 'झिरो-सम गेम'वर आमचा विश्वास नाही. सिंह म्हणाले की, भारत असे द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो, ज्याचा दोन्ही देशांना समान फायदा होईल. युक्रेन संकटावर भारताची भूमिका आणि सवलतीच्या दराने रशियन तेल खरेदी करण्याच्या निर्णयावर अमेरिकेत काही प्रमाणात अस्वस्थता असताना त्यांची टिप्पणी आली आहे. ते म्हणाले, “भारताची प्रतिमा बदलली आहे. भारताचा सन्मान वाढला आहे. जगातील कोणतीही शक्ती भारताला येत्या काही वर्षात जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होण्यापासून रोखू शकत नाही.