Rajiv Gandhi Foundation: गांधी कुटुंबाला केंद्र सरकारचा मोठा झटका; राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाईचा बडगा
Rajiv Gandhi Foundation: केंद्र सरकारने गांधी कुटुंबाला आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाई करत परदेशी निधी स्वीकारण्यास बंदी घातली आहे.
Rajiv Gandhi Foundation: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) अध्यक्ष असलेल्या 'राजीव गांधी फाउंडेशन' (Rajiv Gandhi Foundation) या स्वयंसेवी संस्थेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कारवाई केली आहे. परदेशातून येणाऱ्या निधीबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याने राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या संस्थेला चीनकडून मदत मिळत असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2020 मध्ये केंद्रीय गृह खात्याने स्थापन केलेल्या एका समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राजीव गांधी फाउंडेशन परदेशातून निधी स्वीकारू शकत नाही.
केंद्रातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'राजीव गांधी फाउंडेशन'चे एफसीआरए लायसन्स केंद्र सरकारकडून रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने केलेल्या या कारवाईवर संस्थेकडून अथवा काँग्रेस नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. 'राजीव गांधी फाउंडेशन' च्या अध्यक्षपदी सोनिया गांधी आहेत. तर, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा हे संस्थेचे विश्वस्त आहेत.
तीन संस्थांची चौकशी
केंद्रीय गृहमंत्रालयाने गांधी कुटुंबाशी निगडीत असलेल्या तीन संघटना, राजीव गांधी फाउंडेशन (RGF), राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (RGCT) आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट (IGMT) यांची चौकशी करण्यासाठी सक्त वसुली संचालनालय (ED) अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करण्यात आली होती. जुलै 2020 पासून या संस्थांची चौकशी सुरू करण्यात आली होती. या समितीला मनी लाँड्रिंग कायदा, आयकर कायदा आणि FCRA च्या नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपांची चौकशी करायची होती.
राजीव गांधी फाउंडेशन आहे तरी काय?
राजीव गांधी फाउंडेशनची (RGF) स्थापना 1991 मध्ये झाली. या ट्रस्टने 1991 ते 2009 या काळात आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले, दिव्यांगांना सहाय्य आदी अनेक महत्त्वाच्या विषयांवर काम केले. 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्ये या संस्थेने शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले होते.