Hindi Diwas 2022 : 14 सप्टेंबरला का साजरा केला जातो हिंदी दिन? काय आहे या मागचा इतिहास आणि महत्त्व?
Hindi Diwas 2022 : आज 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन (Hindi Diwas) साजरा केला जातो. हिंदी भाषेचं महत्त्व आणि ओळख पटवून देण्यासाठी हिंदी दिन साजरा केला जातो.
Hindi Diwas 2022 : आज 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन (Hindi Diwas) साजरा केला जातो. हिंदी भाषेचं महत्त्व आणि ओळख पटवून देण्यासाठी तसेच हिंदी भाषेचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आज म्हणजेच 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात 420 मिलियन लोक हिंदी भाषा बोलतात.
हिंदी दिवस का साजरा केला जातो?
14 सप्टेंबर हा दिवस महान साहित्यिक व्यौहार राजेंद्र सिंह (Vyohaar Rajendra Singh) यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी हिंदी भाषेचं महत्त्व पटवून देण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. यामुळे त्यांचा जन्मदिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो.
हिंदी दिवसाचा इतिहास
हिंदी ही देवनागरी लिपीत लिहिलेली इंडो-आर्यन भाषा आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1949 पासून दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. हिंदी दिनानिमित्त देशभरात अनेक सांस्कृतिक उत्सव साजरे केले जातात.हिंदी भाषेला 1949 साली संविधानामध्ये अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली. भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी हिंदी एक महत्त्वाची भाषा आहे.
हिंदी दिवसाव्यतिरिक्त, 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस देखील साजरा केला जातो. 10 जानेवारी 1975 रोजी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद पार पडली होती. ज्यामध्ये 30 देशांतील 122 प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यानंतर 2006 पासून हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी 2006 सालापासून जागतिक हिंदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
हिंदी दिनाचं महत्त्व
हिंदी साहित्याचा सन्मान करण्यासाठी आणि हिंदी भाषेबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी हिंदी दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हिंदी दिनानिमित्त मंत्रालय, विभाग, सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीय बँका आणि नागरिक यांना हिंदी भाषेतील योगदानाबद्दल राजभाषा कीर्ती पुरस्कार आणि राजभाषा गौरव पुरस्कार यांसारखे पुरस्कार दिले जातात.
महत्त्वाच्या इतर बातम्या