(Source: Poll of Polls)
Himachal Election: हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या मतदानाचा उत्साह, 70 टक्क्यांहून अधिक मतदान, निकाल 8 डिसेंबर रोजी
हिमाचल प्रदेशमध्ये आज (शनिवारी) विधानसभेच्या सर्व 68 जागांसाठी मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या निवडणुकीसाठी 70.94 टक्के मतदान झाले.
Himachal Election: हिमाचल प्रदेशमध्ये आज (शनिवारी) विधानसभेच्या सर्व 68 जागांसाठी मतदान पार पडले. राज्यात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असली तरी यावेळी आम आदमी पार्टी (आप) देखील रिंगणात आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या निवडणुकीसाठी 70.94 टक्के मतदान झाले. उना येथे सर्वाधिक 76.69 टक्के मतदान झाले. सर्वात कमी कुलूमध्ये 67.41 टक्के मतदान झाले. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत विक्रमी 75.57 टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा पाच टक्के कमी मतदान झालं आहे. आता शेकडो उमेदवारांचं भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झालं आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झाले?
हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 70.94 टक्के मतदान झाले. उना जिल्ह्यात सर्वाधिक 76.69 टक्के मतदान झाले. सोलनमध्ये 73.21 टक्के, लाहौल स्पीतीमध्ये 67.54 टक्के मतदान झाले आहे. बिलासपूरमध्ये 69.72%, चंबामध्ये 70.74%, हमीरपूरमध्ये 67.07%, कांगडामध्ये 71.27%, किन्नौरमध्ये 62%, कुल्लूमध्ये 70.50%, शिमलामध्ये 68.21% आणि सोलनमध्ये 75.12 टक्के तर मंडी जिल्ह्यात 70.76 टक्के मतदान झाले.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि भाजपचे माजी प्रमुख सतपाल सिंह सत्ती यांच्यासह 68 मतदारसंघातील 412 उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मतदानानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज राज्यभरात झालेल्या मतदानात सर्वच वर्गातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता.ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने निवडणूक प्रचार आणि मतदान शांततेत पार पडले, त्याबद्दल सर्वांचेही आभार.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लोकांना आपल्या मुलांच्या आणि हिमाचलच्या चांगल्या भविष्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते. हिमाचल प्रदेशात आपनं 68 पैकी 67 जागांवर निवडणूक लढवली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, "हिमाचल ओपीएस (ओल्ड पेन्शन स्कीम) साठी मतदान करेल, हिमाचल रोजगारासाठी मतदान करेल, हिमाचल 'हर घर लक्ष्मी' साठी मतदान करेल." मोठ्या संख्येने मतदान करा आणि हिमाचलच्या प्रगतीसाठी आणि समृद्ध भविष्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान द्या, असं राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं होतं.
हिमाचल वोट करेगा OPS के लिए
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 12, 2022
हिमाचल वोट करेगा रोज़गार के लिए
हिमाचल वोट करेगा 'हर घर लक्ष्मी' के लिए
आइए, भारी संख्या में मतदान कीजिए, और हिमाचल की प्रगति और खुशहाल भविष्य के लिए अपना महत्वपूर्ण योगदान दीजिए।