BJP NDA : पंतप्रधान मोदींनी ज्या पक्षाला फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटलं, तोच पक्ष एनडीए आघाडीत
NDA Alliance : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आघाडीत आणखी एक पक्ष सहभागी झाला आहे.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांनी आपली आघाडी अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपविरोधात इंडिया (INDIA) आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपने (BJP) ही एनडीए (NDA) बळकट करण्यावर भर दिला आहे. तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकसोबत युती तुटली असली तरी कर्नाटकमध्ये भाजपला दिलासा मिळाला आहे. देवेगौडा यांचा पक्ष भाजपच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाला आहे. एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी जनता दल सेक्युलर पक्षाला फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटले होते.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरने (जेडीएस) भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी (२२ सप्टेंबर) जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील जागावाटपाबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
बैठकीनंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, जेडीएस राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी झाला असल्याचे म्हटले. त्यांनी सोशल मीडिया X वर म्हटले की, "गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतली. जेडीएसने एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे.
Met Former Chief Minister of Karnataka and JD(S) leader Shri H.D. Kumaraswamy in the presence of our senior leader and Home Minister Shri @AmitShah Ji.
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) September 22, 2023
I am happy that JD(S) has decided to be the part of National Democratic Alliance. We wholeheartedly welcome them in the NDA.… pic.twitter.com/eRDUdCwLJc
कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरचा प्रभाव पडणार?
सध्या कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 135 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला सत्ता गमवावी लागली. भाजपने 66 तर जेडीएसने 19 जागा जिंकल्या होत्या.
अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही युती महत्त्वाची मानली जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कर्नाटकमध्ये 25 जागा जिंकल्या होत्या, तर त्यांच्या समर्थित अपक्षांनी (मंड्यातील सुमलता अंबरीश) एक जागा जिंकली होती. तर काँग्रेस आणि जेडीएसने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. राज्यात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले जेडीएसचे उमेदवार आणि देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांची खासदारकी रद्द झाली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात रेवण्णा यांनी मालमत्तेची माहिती लपवली असल्याचा आरोप करत तत्कालीन निवडणुकीतील भाजपचे उमेदवार ए मंजू यांनी याचिका दाखल केली होती.
जेडीएसवर पंतप्रधान मोदींनी केली होती टीका
कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता दल सेक्युलरवर टीका केली होती. देवेगौडा यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हसन जिल्ह्यात पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी जेडीएस हा पक्ष एक फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड पार्टी असल्याचे म्हटले होते.