उत्तर प्रदेश : हाथरस प्रकरणातील चारही आरोपींनी जेलमधून उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहलं असून त्या पत्रात आपण निर्दोष असल्याचं चारही आरोपिंनी सांगितलं आहे. पत्रात आरोपींनी नमूद केलं आहे की, या आरोपींची पीडितेसोबत मैत्री होती. त्यांचं एकमेकांसोबत बोलणंही होत असे. परंतु, पीडितेला मारहाण आरोपींनी केलेली नाही. तर पीडितेची आई आणि भावाने केलेली आहे. या मारहाणीनंतरच पीडितेचा मृत्यू झाला. पत्रात चारही आरोपी संदीप, रामू, रवी आणि लवकुश यांच्या सह्या आणि अंगठ्याचे ठसेही आहेत.


आरोपींनी पत्रात लिहिलं आहे की, त्यांची पीडितेसोबत मैत्री होती. फोनवरही बोलणं होत असे. याच कारणामुळे त्या दिवशी आई आणि भावाने पीडितेला मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पीडितेला पाणीही पाजलं होतं. परंतु, उलट त्यांनाच या प्रकरणात अडकवण्यात आलं. तसेच असं पत्र लिहून आरोपींनी उत्तर प्रदेश पोलिसांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.


पीडितेच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका


हाथरस प्रकरणातील पीडित तरूणीच्या कुटुंबियांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करत दावा केला आहे की, जिल्हा प्रशासनाने अवैध्यरित्या त्यांना घरात डांबून ठेवलं आहे. त्यांची यातून सुटका करण्यात यावी आणि घरातून बाहेर पडण्यास तसेच लोकांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात यावी.' या याचिकेमध्ये पीडितेच्या कुटुंबियांची बाजू वाल्मिकी समाजासाठी काम करणारी एक संघटना मांडत आहे. पीडितेचे वडील, पीडितेची आई, दोन भाऊ आणि दोन इतर नातेवाईकांनी ही याचिका दाखल केली आहे.


या याचिकेमध्ये आरोप लावण्यात आला आहे की, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने याचिकाकर्त्यांना त्यांच्या घरी अवैध्यरित्या डांबून ठेवलं आणि त्यांना कोणलाही भेटू दिलं नाही. दरम्यान, त्यानंतर काही लोकांना त्यांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, आताही जिल्हा प्रशास याचिकाकर्त्यांना त्यांच्या इच्छेने घराबाहेर पडू देत नाही.


याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की, त्यांना लोकांना भेटण्यापासून किंवा बोलण्यापासून रोखलं जात आहे. ज्यामुळे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहिती मिळवण्याच्या अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे.


तपासासाठी एसआयटीला आणखी 10 दिवसांची मुदतवाढ


हाथरस प्रकरणी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) तपास करत असून बुधवारी एसआयटी आपला अहवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपावणार होती. मात्र आज सकाळीच एसआयटीला आणखी दहा दिवसांचा अवधी मिळाला आहे. गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचा तपास सुरु आहे. या प्रकरणात एसआयटीला तपासासाठी एक आठवड्यांचा मुदत देण्यात आली होती. दरम्यान तपसासाठी आणखी 10 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.


Hathras Gang Rape | पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही!


पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही


उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी पीडितेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही. परिणामी या अहवालाचा थेट फायदा स्वाभाविकपणे आरोपींना होणार आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पीडितेच्या कुटुंबीयांना न सांगताच पोलिसांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले, त्याचप्रमाणे या शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली का असाही प्रश्न उपस्थित होत आहेत.


दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने पीडितेचं शवविच्छेदन केलं. या शवविच्छेदन अहवालानुसार, "पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला आहे." तसंच गळ्यावर जखमांचे निशाण आहे. पीडितेला ब्लड इन्फेक्शन झालं आणि हार्ट अटॅकही आला होता. या तरुणीचा मृत्यू 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी झाला होता, असं अहवालात नमूद केलं आहे.


14 सप्टेंबर रोजी पाशवी अत्याचार, 29 सप्टेंबरला अखेरचा श्वास


14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :