मुंबई: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची आठवण करून दिली आहे. चित्रा वाघ यांच्या या ट्विटला राष्ट्रवादीच्या महिला राज्य अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी 'आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी चित्राबेन तुम्ही सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या पक्षात प्रवेश केला.' असं म्हणत उत्तर दिलं आहे.
गृहमंत्र्यांच्या ट्विटला चित्रा वाघांचा उत्तर तर रुपाली चाकणकर म्हणाल्या...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल, असा निशाणा योगींवर साधला. त्यावर “कोविड-क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार, विनयभंग केले जातात. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय, त्यावर तुम्हाला ट्विट करावंसं वाटलं नाही का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांना विचारला. हाथरसच्या घटनेचा आम्ही तीव्र निषेधच करतो. पण मला सांगा राज्यात अल्पवयीन मुलींवर सामुहीक बलात्कार करून खूनाचं सत्र सुरू आहे. कोविड-क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार होतायत, विनयभंग केले जातात, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय… त्यावर तुम्हाला ट्विट करावंसं वाटलं नाही का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. वाघ यांच्या या ट्विटवर रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की, आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी चित्राबेन तुम्ही सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या पक्षात प्रवेश केला.ते स्वतः गृहमंत्री होते तेव्हा त्यांच्या नागपूर मध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली.त्यावर मात्र तुम्ही सोयीस्कर दुर्लक्ष केलं, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. राहिला प्रश्न कोविड सेंटर मध्ये झालेल्या गुन्ह्यांचा तर पुण्यात सत्ता तुमची,खासदार तुमचे,आमदार तुमचे पण कधी त्यांना जाब विचारावासा नाही वाटला का तुम्हाला? असा सवाल चाकणकर यांनी केला आहे.
योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही : जयंत पाटील
छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याआधी योगी आदित्यनाथ यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. न्याय, सन्मान आणि समानतेचे राज्य जर प्रस्थापित करता येत नसेल तर योगी आदित्यनाथ यांना महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असा संताप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवर व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. काल मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार मृतदेह घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे. या प्रकरणावर मंत्री जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. जयंत पाटील पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की उत्तर प्रदेश सरकारचे हे कृत्य अमानवी व दुर्दैवी आहे. महिलांना ना जिवंतपणी सन्मान मिळत आहे ना मेल्यानंतर.
पोलिसांनीच बळजबरीने केले पीडितेवर अंत्यसंस्कार, परिवाराचा आरोप
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत. याबाबत पीडितेच्या परिवारानं आरोप केले आहेत, तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. हाथरसमधील अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
'भारत की बेटी' वर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्य लपवलं जातंय आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्क देखील हिरावला जातोय, असं ट्वीट राहुल गांधींनी एक व्हिडीओ शेअर करत केलंय. युपीतील वर्ग-विशेष जंगलराजने आणखी एका तरुणीची हत्या केली. ही फेक न्यूज आहे असं सांगत सरकारने पीडितेला मरण्यासाठी सोडून दिलं. दुर्दैवाने ही घटना फेक न्यूज नव्हती, ना पीडितेचा मृत्यू आणि ना सरकारची क्रूरता, असं ट्विट करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.
आमची दिशाभूल केली जातेय- पीडितेचा भाऊ
सफदरजंगमध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या पीडितेच्या परिवाराला काल पोलिसांनी तिथून हटवलं. परिवाराकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत हॉस्पिटलसमोर आंदोलन सुरु केलं होतं. पीडितेच्या भावाचं म्हणणं आहे की, आमची दिशाभूल केली जात आहे. आम्हाला न्याय हवा आहे. हॉस्पिटलबाहेर काँग्रेस, भीम आर्मी आणि अन्य संघटनांनी देखील आंदोलनं केली. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणी न्याय व्हावा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, असं त्यांनी म्हटलं आहे.
हाथरस अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून बळजबरीने अंत्यसंस्कार, राहुल गांधींकडून व्हिडीओ पोस्ट
रेप झाला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही- आयजी
या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात केस दाखल करण्याबाबत आयजी पीयूष मोर्डिया यांचं म्हणणं आहे की, पीडितेच्या जबाबानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र रेप झाला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, कारण जे एन मेडिकल कॉलेजच्या रिपोर्टमध्ये तसं म्हटलं आहे. सॅम्पल 26 सप्टेंबर रोजी फॉरेंसिक सायंस लॅबोरेटरीकडे पाठवले आहेत. त्याचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. ते रिपोर्ट आल्यावर याबाबत स्पष्टपणे माहिती येईल असं, मोर्डिया यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात चार आरोपिंना पकडण्यात आलं आहे.
19 वर्षाच्या मुलीसोबत रेप आणि हत्या
माहितीनुसार यूपीच्या हाथरस जिल्हातील एका गावात 14 सप्टेंबर रोजी 19 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. घटनेनंतर पीडितेला अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. सोमवारी तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला उपचारासाठी दिल्लीला आणलं. मात्र मंगळवारी उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. यूपी सरकारने पीडितेच्या कुटूंबासाठी 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.