पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना जेडीयूकडून तिकिट देण्यात आलेलं नाही. गुप्तेश्वर पांडे यांनी नुकतंच डीजीपी पदाचा राजीनामा देत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते बक्सरमधून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र काल पक्षाने आपल्या कोट्यातील सर्व 115 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. या यादीमध्ये  गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही.  बक्सरची जागा युतीमध्ये भाजपच्या खात्यात गेली असून भाजपकडून या जागेवर  परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाली आहे. यानंतर निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.


गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे की, आपल्या अनेक हितचिंतकांच्या आवाहनामुळे मी अस्वस्थ झालो आहे. त्यांच्या चिंता आणि समस्या मलाही समजल्या आहेत. निवृत्तीनंतर प्रत्येकाची अपेक्षा होती की मी निवडणूक लढवावी. पण यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. निराश होण्याचं काहीच नाही. धीर धरा. आपलं आयुष्य संघर्षातच गेलं आहे. मी आयुष्यभर सार्वजनिक सेवेत राहीन. कृपया धीर धरा आणि मला फोन करू नका. आयुष्य बिहारच्या जनतेसाठी मी जीवन वाहिलं आहे, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.



माझी जन्मभूमी बक्सर आहे. तिथल्या सर्व वडिलधाऱ्यांना, बंधू, भगिणी, माता आणि तरुणांसह तेथील जाती, धर्माच्या सर्व वडिलधाऱ्यांना प्रणाम आणि आपलं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.


बिहार निवडणुकीत गुप्तेश्वर पांडेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज : अनिल देसाई


शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार


सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झालेल्या बदनामीनंतर शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली असून बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. 2015 मध्ये शिवसेनेने 80 जागा लढवत 2 लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यंदा शिवसेना 50 जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी संशय व्यक्त केला होता, त्यांना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झाला आहे, असं शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं होतं.