(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नेहरुंऐवजी जिना भारताचे पंतप्रधान झाले असते तर फाळणी झाली नसती : दलाई लामा
बॅरिस्टर जिना यांना पंतप्रधानपदी बसवायची महात्मा गांधी यांची इच्छा होती. पण नेहरुंच्या महत्त्वाकांक्षेमुळे ते झालं नाही असं विधान दलाई लामा यांनी केलं आहे.
गोवा : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी मोहम्मद अली जिना पंतप्रधान झाले असते, तर देशाची फाळणी झाली नसती, असं खळबळजनक विधान बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी केलं आहे. काल गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्टच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला.
बॅरिस्टर जिना यांना पंतप्रधानपदी बसवायची महात्मा गांधी यांची इच्छा होती. पण नेहरुंच्या महत्त्वाकांक्षेमुळे ते झालं नाही आणि त्यामुळेच भारताची फाळणी झाल्याचंही दलाई लामा म्हणाले. पंडित नेहरु अत्यंत अनुभवी होते, पण अनेकदा त्यांच्याकडून चुका झाल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.'भारतातील पुरातन काळातील माहितीची आजची गरज' या विषयावर बोलताना दलाई लामा म्हणाले की, फक्त अहिंसा असलेल्या भारत देशाकडेच पुरातन काळातील ज्ञान व आजचे शिक्षण यांना जोडण्याची क्षमता आहे.
भारताच्या संस्कृतीत परंपरा व ज्ञान हे रुजलेले आहेत. यात ध्यान कला, अनुकंपा, निधर्मीपणा आदींचा समावेश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ब्रिटीशांनी आधुनिक शैक्षणिक आणली असली तरी भारत एकमात्र देश आहे जो पुरातन ज्ञान व आधुनिक शिक्षण यांचा समतोल राखू शकतो, असं दलाई लामा म्हणाले.
भारतीय मुस्लिम सहनशील असल्याचे दलाई लामा यांनी यावेळी सांगितलं. अफगाणिस्तान आणि सीरियामधील मुस्लिम भारतीयांसोबत एकत्र राहू शकतात असंही त्यांनी सांगितलं.