(Source: Poll of Polls)
गुजरातमध्ये यापुढं ड्रॅगन फ्रूटचं नवं नाव असेल 'कमलम'
गुजरातमध्ये भाजप कार्यालयाचं नावही कमलम आहे. आता या नामकरणाचा नेटकऱ्यांनी भाजपशीही संबंध जोडण्यास सुरुवात केली आहे.
गांधीनगर : आपल्याला फळं खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. त्यातही काही फळांचे गुणधर्म शरीरासाठी अतिशय फायद्याचे असल्यानं अशा फळांना अनेकांकडून विशेष पसंती दिली जाते. काही फळं ही त्यांच्या रंग, रुपामुळंही ओळखली जातात. त्यामुळं चर्चेत राहण्यास त्यांना ही कारणंही पुरेशी. असंच एक फळ म्हणजे ड्रॅगन फ्रूट.
साधारण गुलाबी रंग, वरुन एक वेगळाच आकार यामुळं हे फळ काही वर्षांपूर्वी भारतात मागील काही वर्षांपूर्वी कुतूहलाचा विषय ठरलं होतं. पाहता पाहता, भारतातही हे फळ स्थिरावलं. पण, आता याच देशातील एका राज्यात या फळाचं नावच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता म्हणजे हे फळ, 'कमलम' या नावानं ओळखलं जाणार आहे. ज्या राज्यानं हा अजब बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ते राज्य म्हणजे गुजरात. 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार खुद्द गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीच याबाबतची माहिती दिली.
'राज्य सरकारनं (Dragon Fruit) ड्रॅगन फ्रूट या फळाचं नाव बदलण्याचा निर्णय़ घेतला आहे. या फळाचा बाह्य आकार हा कमळाच्या फुलाप्रमाणं आहे. त्यामुळं याचं नाव ''कमलम'' असायला हवं', असं रुपाणी म्हणाले. या फळाच्या नावाचा चीनशी संदर्भ लागतो आणि आम्ही तो बदलला आहे, असंही स्पष्टीकरण त्यांनी मंगळवारी दिलं.
कमळाला संस्कृतमध्ये कमलम, असं म्हणतात. मुख्य म्हणजे इथं गुजरातमध्ये भाजप कार्यालयाचं नावही कमलम आहे. त्यामुळं आता या नामकरणाचा नेटकऱ्यांनी भाजपशीही संबंध जोडण्यास सुरुवात केली आहे.
मागील काही वर्षांपासून ड्रॅगन फ्रूट भारतात कमालीचं लोकप्रिय झालं आहे. अनेकांनीच डाएटमध्येही या फळाचा समावेश केला आहे. गुजरातमध्ये भूज, गांधीधाम आणि मांडवी इथं या फळाचं उत्पादन घेतलं जातं.
State government has decided rename Dragon Fruit. As the outer shape of the fruit resembles a lotus, hence Dragon Fruit shall be renamed as 'Kamalam': Gujarat CM Vijay Rupani (19.1) pic.twitter.com/tkWfCuUTN4
— ANI (@ANI) January 19, 2021
पंतप्रधानांकडूनही या फळाचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमातही या फळाचा उल्लेख केला होता. या परदेशी फळाचं उत्पादन घेणाऱ्या कच्छ येथील शेतकऱ्यांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं होतं. हे फळ मुळचं दक्षिण अमेरिकेतील आहे.