Rajkot Gaming Zone Fire : गेमिंग झोन अडीच वर्ष सुरु होता, तुम्ही झोपला होता काय? गुजरात हायकोर्टाचे अग्नितांडवानंतर राजकोट महापालिकेला खडेबोल
Rajkot TRP Gaming Zone Firing : राजकोटमधील टीआरपी गेमिंग झोनला लागलेल्या आगीत 32 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन गुजरात हायकोर्टानं राज्य सरकार आणि राजकोट महापालिकेला खडेबोल सुनावले आहेत.
सूरज ओझा, अहमदाबाद : राजकोटमधील टीआरपी गेमिंग झोनला लागलेल्या आगीत 32 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात गुजरात हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत गुजरात हायकोर्टानं राज् सरकार आणि प्रशासनाला खडेबोल सुनावले. टीआरपी गेमिंग झोन अवैध जागेत होता. गेमिंग झोनला सरकारी नियमानुसार नियमित करण्याची परावनगी मागण्यात आली होती.अग्निसुरक्षेबाबत 4 वर्षांपासून सुनावणी सुरु होती, अशी माहिती न्यायालयात सादर करण्यात आली. आम्ही काही निर्देश दिल्यानंतर देखील अशा घटना घडल्या आहेत, स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असं गुजरात हायकोर्टानं म्हटलं.
गुजरात हायकोर्टानं राजकोट महापालिकेला झापलं
राज्य सरकारच्यावतीनं बाजू मांडण्यासाठी राज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता न्यायालयात हजर झाले होते.चार वर्षांपासून हायकोर्टानं निर्णय आणि निर्देश दिले आहेत. त्यानंतर राज्यात 6 घटना झाल्या आहेत, असं परखड मत हायकोर्टानं मांडलं.न्यायालयानं राजकोट महापालिकेकडून स्पष्टीकरण मागितलं. टीआरपी गेमिंग झोनला परवानगी घेण्यात आली नव्हती हे राजकोट पालिकेकडून मान्य करण्यात आलं. यानंतर तुम्ही झोपला होता का, असा प्रश्न विचारत हायकोर्टानं राजकोट महापालिकेला झापलं आहे.
अडीच वर्षापासून टीआरपी गेमिंग झोन सुरु होता तेव्हा तुम्ही झोपला होता का? तुम्ही या प्रकरणी डोळे मिटून घेतले होते असं आम्ही म्हणायचं का? असे परखड सवाल राजकोट महापालिकेला गुजरात हायकोर्टानं केले. तुमचे अधिकारी गेम झोनमध्ये गेल्याचे फोटो समोर आले आहेत, तुमचे अधिकारी गेम खेळण्यासाठी गेले होते का?, असा सवाल देखील हायकोर्टानं विचारला.
अहमदाबादमधील 2 गेम झोनकडे परवानगी नाही हे मान्य करण्यात आलं.राज्य सरकारच्यावतीनं वकील मनीषा लव कुमार शाह यांनी माहिती न्यायालयात दिली.एसआयटी स्थापन करुन 72 तासात अहवाल द्या, असं गुजरात हायकोर्टानं सांगितलं. काही मॉलमध्ये गेम झोन सुरु असून आम्हाला याची माहिती उद्यापर्यंत मिळेल, असं गुजरात सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं.
48 तासात 6 अधिकाऱ्यांचं निलंबन
गेल्या 48 तासात 6 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हा विकास अधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी, मुख्य अधिकारी, यांच्याकडून गेमिंग झोनची माहिती मागवण्यात आली आहे. माहिती मिळताच सीक्षण करण्यात आलं. काही ठिकाणांना सील लावण्यात आलं आहे, अशी माहिती देण्यात आली.
राज्यातील सर्व गेम झोन बंद असून हरणी दुर्घटनेनंतर सुरक्षेसाठी एका समितीची स्थापना करुन कोर्टाला माहिती दिली आहे.
राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये नियमांचं पालन करण्यात आलं नव्हतं. अहमदाबादमध्ये 34 गेमिंग झोन, 28 इनडोअर आणि 6 आऊटडोर गेम झोन आहेत. 31 गेमिंग झोनकडे अग्निसुरक्षेबाबत एनओसी, 3 गेमिंग झोनकडे एनओसी नव्हती, अशी माहिती देण्यात आली. 6 गेम झोन पैकी तीन मालकांना अटक करण्यात आली, असं देखील सांगण्यात आलं. हायकोर्टानं गेमिंग झोन आग प्रकरणावरुन राजकोट महापालिका आणि इतर विभागांना खडे बोल सुनावले आहेत.
संबंधित बातम्या :