Gujarat Assembly Election 2022 : 500 डॉक्टरांचा एकाच वेळी भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग
गुजरातमधील सुमारे 500 डॉक्टरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Gujarat Assembly Polls 2022 : या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमधील सुमारे 500 डॉक्टरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये डॉक्टरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपची ताकद आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.
भाजपची गेल्या 27 वर्षांपासून गुजरातवर सत्ता कायम आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने गुजरात राज्य महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत भाजपने अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. 4 मे पासून पुढील 6 महिने न थांबता काम करण्याच्या सूचना पक्षाने कार्यकर्त्यांना आधीच दिल्या आहेत. याआधी नुकत्याच 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यापैकी 4 राज्यांमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपची सत्ता कायम राखण्यात यश मिळाले आहे. केवळ पंजाबमध्ये भाजपला यश मिळवता आले नाही. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने बाजी मारली. त्यामुळे गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारी सुरु केली आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर.पाटील म्हणाले की, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय राहावेत अशी आमची इच्छा आहे. आम्ही 1 मे ते 4 मे या कालावधीत कोणताही कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण 1 मे ही सार्वजनिक सुट्टी होती. यानंतर कार्यकर्ते गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. पुढील 6 महिने सर्व कार्यकर्त्यांनी न थांबता काम करायचे आहे, कारण आम्हाला आमचे सर्वोत्तम देणे आवश्यक असल्याचे सी.आर.पाटील यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हेही गुजरात दौऱ्यावर
गुजरातमध्ये आधीच निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन महिन्यात गुजरातचे दोन दौरे केले आहेत. त्यांच्या दौऱ्यानंतर गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या काही महिन्यात आणखी गुजरातच्या दौऱ्यावर येणार आहेत. वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांनी देखील गुजरात राज्याचा दौरा केला आहे. गुजरातने केवळ राज्य किंवा केंद्रीय राजकारण्यांनाच नाही तर परदेशातील लोकांना देखील आकर्षित केल्याचे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे.