(Source: ECI/ABP News/ABP Majha)
e Shram Portal Registration: असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी e-Shram पोर्टलची घोषणा, मिळणार विमा कवच आणि अनेक सुविधा
e Shram Portal Registration: e-Shram पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाखांचा विमा मिळणार आहे. तसेच कायमचं अपंगत्व आल्यास एक लाखाची मदत करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी असून त्यांना आता मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरु आहे. याचाच एक प्रयत्न म्हणून केंद्रीय कामगार मंत्रालयाने गुरुवारी ई-श्रम e-Shram पोर्टल (e-Shram Portal) सुरु केलं आहे. त्या माध्यमातून जवळपास 38 कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असंघटित क्षेत्रातील 38 कोटी कामगारांची नोंदणी करण्यात येणार असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, रोजंदारी कामगार आणि इतर सर्व प्रकारच्या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे येणार आहे.
देशभर के 38 करोड़ से अधिक असंगठित कामगारों को विभिन्न सामाजिक सुरक्षा योजनाओं से जोड़ने के लिए ई-श्रम पोर्टल की शुरुआत की गई है।
— Ministry of Labour (@LabourMinistry) August 26, 2021
आइये ई-श्रम से जुड़ें और आगे बढ़ें।https://t.co/GyNG8CXU6a#ShramevJayate@PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli @PIBHindi @MyGovHindi @MIB_Hindi pic.twitter.com/omDmlZVyWV
अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा
ई-श्रम पोर्टलवर (e-Shram Portal) सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद करावी असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्यात येणार आहे. तसेच अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
ई- श्रम पोर्टलवर (e-Shram Portal) नोंदणी कशी करणार?
सर्व प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना eshram.gov.in या पोर्टलवर (e-Shram Portal) नोंदणी करता येणार आहे. यासाठी 14433 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. या पोर्टलवर जाऊन कामगारांना आपली सर्व माहिती भरावी लागेल, सोबत आपल्या आधारचा आणि बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल. त्यानंतर संबंधित कामगाराला 12 अंकी युनिक नंबर असलेले ई-श्रम कार्ड देण्यात येईल. त्याच्या मदतीने या कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kabul Airport Blast : काबुल स्फोटाची जबाबदारी ISIS-K ने स्वीकारली, जशास-तसं उत्तर देण्याचा अमेरिकेचा इशारा
- अमिताभ बच्चन यांचे सुरक्षारक्षक हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची बदली, कोटींच्या घरात कमाईची चर्चा, चौकशी होणार
- Tokyo Paralympics 2020 : भारताला धक्का; आजारी असल्याने सुयश जाधव आजच्या स्पर्धेला मुकणार