वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास सहा महिने ते सात वर्षांची शिक्षा; केंद्र सरकारचा अध्यादेश
यापुढे कोणत्याही वैद्यकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यास सहा महिने ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा होणार आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची केंद्र सरकाराने गंभीर दखल घेतली असून तसा अध्यादेश काढला आहे.
नवी दिल्ली : वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढणार असून डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही. तसेच सहा महिने ते सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली आहे. सतत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्लाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उद्या गुरुवारी आंदोलन करणार होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षेचं आश्वासन दिल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (बुधवार) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत अमित शहा यांनी डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यापुढे कोणत्याही वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास किमान सहा महिने तर कमाल सात वर्षापर्यंतची शिक्षा होणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे.
Attack on Doctors | अमित शाहांच्या आश्वासनानंतर आयएमएच्या डॉक्टरांचं आंदोलन मागे
डॉक्टर्स का करणार होते आंदोलन? डॉक्टरांवरचे हल्ले हा खरं तर जुनाच विषय. पण कोरोनाच्या या गंभीर संकटातही हे प्रकार थांबलेले नाहीत. कुठे यांना सोसायटीत प्रवेश दिला जात नाही, कुठे अपमानास्पद वागणूक मिळत आहे, तर कुठे मारहाणही करण्यात येत आहे. समाजासाठी जीव धोक्यात घालून काम करावं तर ही अवस्था. तर चेन्नईमध्ये कोरोनामुळे एका डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीलाही लोकांनी विरोध केला. अॅम्ब्युलन्सवर दगडफेक केली. मृत्यूमध्येही आम्हाला सन्मान नाकारला जातोय, अशा कडक शब्दांत नाराजी व्यक्त डॉक्टरांनी या पत्रात सरकार निर्वाणीचा इशारा दिला होता. तसेच, अगदी पंधरा दिवसांपूर्वींच इंदूरमध्ये कोरोनाची टेस्ट करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना असा हल्ला सहन करावा लागला. मुंबईतल्या नर्सेसनी सोसायटीत नीट वागणूक देत नसल्याची तकार केली होती. चेन्नईप्रमाणेच आंध्र प्रदेशातही काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर लोकांनी त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केला, निदर्शनं झाली.
Corona Ground Report | कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट! काय म्हणतोय गावाकडचा कोरोना?