(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नव्या आयटी कायद्यांबाबत सरकारकडून FAQ जारी; जाणून घ्या सविस्तर
Government issues FAQs on IT rules : केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी नवे आयटी कायदे जारी केले होते. भारत सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन IT नियम लागू केले होते.
Government issues FAQs on IT rules : माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं सोमवारी मध्यवर्ती संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वांबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) जारी केले आहेत. इंटरनेट आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये नवीन नियमांची उद्दिष्टे आणि तरतुदींबद्दल अधिक चांगली समज निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. FAQ जारी करताना, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, इंटरनेट वापरकर्त्यांसाठी खुलं, सुरक्षित आणि विश्वासार्ह असलं पाहिजे. ते म्हणाले की, सायबर स्पेस अशी जागा असू शकत नाही, जिथे कोणत्याही गुन्हेगाराला आश्रय घेता येईल.
नव्या आयटी नियमांबाबत विचारले जाता सर्वाधिक प्रश्न
नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न (FAQ) मध्ये अशा प्रश्नांचा नेहमीच समावेश केला जातो. ज्या नियमांबाबत लोकांना अनेक प्रश्न असून त्यांना त्याबाबतची अधिक माहिती घेण्याची इच्छा आहे. यामुळे युजर्सना इंटरनेट आणि सोशल मीडियाचे नियम समजणं सोपं होणार आहे.
... म्हणून भारत सरकारनं लागू केले आयटीचे नवे नियम
भारत सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन IT नियम लागू केले. ट्विटर आणि फेसबुक सारख्या सर्व मोठ्या टेक कंपन्यांना अधिक उत्तरदायित्व आणणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. नियमांनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकार्यांकडून कोणतीही पोस्ट किंवा निवेदन आक्षेप घेतल्यानंतर 36 तासांच्या आत काढून टाकणं आवश्यक आहे. यासोबतच देशात अधिकाऱ्यांच्या तैनातीसोबत मजबूत तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याचीही गरज आहे.
तक्रार मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत पोस्ट काढणं गरजेचं
सोशल मीडिया कंपन्यांनी तक्रार मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत अश्लील किंवा छेडछाड केलेल्या पोस्ट काढून टाकणे आवश्यक आहे. मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना देखील मासिक आधारावर अनुपालन अहवाल सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये त्यांना आलेल्या तक्रारी आणि त्या दूर करण्यासाठी काय पावले उचलण्यात आली याची माहिती द्यावी लागणार आहे. मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांमध्ये 5 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या संस्थांचा समावेश होतो.