स्वयंपूर्ण गोवा हे विकासाचं मॉडेल, आत्मनिर्भर भारतामध्ये मोठं योगदान; पंतप्रधान मोदींची स्तुतीसुमनं
आत्मनिर्भर भारतासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोव्याकडं असून भारताच्या विकासात गोव्याचं मोठं योगदान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्यावर स्तुतीसुमनं उधळली असून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोव्याकडं असल्याचं सांगितलं. स्वयंपूर्ण गोवा हे विकासाचं मॉडेल असून आत्मनिर्भर भारताच्या विकासामध्ये गोव्याचं मोठं योगदान आहे. गोव्याच्या माध्यमातून नॅशनल आणि इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटीचा विकास चांगल्या पद्धतीने झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते 'आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा' कार्यक्रमात संवाद साधत होते.
गोव्यातील गावांच्या विकासासाठी 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. या आधी गोवा राज्याला जेवढा फंड मिळायचा त्याच्या पाचपट अधिक फंड सध्याचं केंद्र सरकार देत असल्याचा दावाही त्यांनी केला. गेल्या एका वर्षाच्या कालावधीत गोव्यातील फळांचे आणि भाज्यांचे उत्पादन हे 40 टक्क्यांनी तर दुधाच्या उत्पादनात 20 टक्क्यांची वाढ झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "गोव्याचा उदय हा भारताच्या शक्तीच्या स्वरुपात झाला आहे. गोव्याचा दुप्पट वेगाने विकास व्हावा ही सरकारची प्राथमिकता आहे. गोव्यातील मच्छीमारांना प्रधानमंत्री मत्स पालन योजनाचा मोठा लाभ झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने गती घेतली असून त्यामध्ये गोव्याचं योगदान मोठं आहे. आपल्या सरकारने व्हिसा ऑन अरायव्हलच्या सुविधेचा विस्तार केल्याने त्याचा फायदा गोव्याला मोठ्या प्रमाणावर झाला आहे."
देशामध्ये लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला असून त्याचा फायदा पर्यटन क्षेत्राला होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला गोवा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आता या लहान राज्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत एक महत्वाची बैठक घेतली.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut : गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवणार; संजय राऊतांचे स्पष्टीकरण
- Corona Vaccination : हिमाचल पाठोपाठ गोव्यातही 100 टक्के लसीकरण, देशात 73 कोटी डोस वितरित
- देवेंद्र फडणवीस गोव्या विधानसभेचे प्रभारी, पक्षानं सोपवली महत्त्वाची जबाबदारी