G20 Summit : जी-20 परिषदेचं यजमानपद पहिल्यांदाच भारताकडे, असं असेल संपूर्ण परिषदेचं वेळापत्रक
G20 Summit : 9 सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या जी - 20 परिषदेसाठी भारताची तयारी पूर्ण झाली आहे. तर पहिल्यांदाच ही परिषद भारतामध्ये होणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी - 20 परिषदेचं (G20 Summit) आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान या परिषदेशिवाय पंतप्रधान मोदी हे ब्रिटन, जपान, जर्मनी आणि इटलीसोबत द्विपक्षीय बैठक देखील करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी भारत मंडपन येथे डिनर डिप्लोमसीचे आयोजन देखील केले. दरम्यान या परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख नेते भारतात पोहचले आहेत. यावेळी या नेत्यांचे केंद्रीय मंत्र्यांनी विमानतळावर स्वागत देखील केले.
असं असेल परिषदेचं संपूर्ण वेळापत्रक
सकाळी 8.30 ते 9.30 च्या दरम्यान सगळे प्रमुख नेते हे भारत मंडपम याठिकाणी पोहचतील. त्यानंतर सकाळी 9.45 वाजता एक समूह छायाचित्र देखील काढण्यात येणार आहे. सकाळी 10.15 वाजता पंतप्रधान मोदींचे उद्घाटनाचे भाषण होणार आहे. तर 10.30 वाजल्यापासून बैठकीचं पहिलं सत्र सुरु होणार आहे. यामध्ये दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय. दुपारी 2.45 वाजता बैठकीचं दुसरं सत्र सुरु होईल. या कालावधीमध्ये चहापानाचा कार्यक्रम पार पडेल. तर संध्याकाळी 7.30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेमध्ये हे नेते होणार सहभागी
जी-20 परिषदेमध्ये बरेच नेते सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या परिषदेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील जी-20 परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे सुद्धा या परिषदेसाठी दिल्लीत हजर राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दाखल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. तसेच त्यांच्या या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक देखील पार पडली आहे. या बैठकीवेळी बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांना चांद्रयान-3 च्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. तर या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील जी - 20 परिषदेसाठी भारतात दाखल झालेत. यांच्यासह जपान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश यांसह अनेक प्रमुख देशांचे नेते या परिषदेसाठी भारतात पोहचले आहेत.