G 20 Summit 2023: पंतप्रधान ऋषी सुनक देणार सपत्नीक अक्षरधाम मंदिराला भेट, असं असेल संपूर्ण वेळापत्रक
G 20 Summit 2023: जी -20 परिषदेचे कार्यक्रम हे नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये होत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे जी - 20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली (Delhi) येथे जी -20 परिषदेचं (G20 Summit) आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) भारतात पोहचलेत. त्यांनी शनिवारी (9 सप्टेंबर) जी -20 शिखर परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी द्विपक्षीय बैठक देखील केली. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत करतांना ऋषी सुनक यांनी म्हटलं की, रविवार 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत असलेल्या अक्षरधाम मंदिरात आम्ही भेट देणार आहोत.' तर एबीपी न्यूजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी देखील यावेळी त्यांच्यासोबत अक्षरधाम मंदिराला भेट देतील. सकाळी 6.30 च्या दरम्यान ते अक्षरधाम मंदिरात जातील. तर जवळपास तासभर ते या मंदिरात थांबणार असल्याची माहिती देण्यात आली.
काय म्हणाले ऋषी सुनक?
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शुक्रवारी (८ सप्टेंबर) एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. त्याच धर्मात माझं पालनपोषण झालं आहे. मी भारतातल्या मंदिरांना देखील भेट देईन.
G-20 in India: UK Prime Minister Rishi Sunak to visit Delhi's Akshardham temple on Sunday, September 10.
— ANI (@ANI) September 9, 2023
(file pic) pic.twitter.com/jZeW4asH9f
ऋषी सुनक यांच्या हातावर राखी बांधल्यांच दिसत होतं. त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, मी देखील रक्षाबंधन साजरे केले आहे. त्यामुळे माझ्या हातात राखी आहे. मला जन्माष्टमी साजरी करण्यासाठी वेळ नाही. पण मी मंदिरात जाऊन त्याची भरपाई करेन. माझ्या मते विश्वास ही प्रत्येक व्यक्तीला मदत करणारी गोष्ट आहे. विशेषत: जेव्हा तुमच्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असते तेव्हा तोच विश्वास तुम्हाला काम करण्याची उर्जा देतो.
भारताबद्दल काय म्हणाले ऋषी सुनक?
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिलेच भारतीय वंशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी उद्योगपती नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षरा मूर्ती हिच्याशी विवाह केला आहे. भारतात येण्यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं की, मी भारतात जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. कारण तो देश माझ्यासाठी खूप जवळचा आणि प्रिय आहे.
ऋषी सुनक आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक देखील पार पडली. या बैठकीमध्ये भारत आणि ब्रिटनमधील व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर यावेळी ऋषी सुनक यांना भेटून खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
हेही वाचा :
G20 Summit: G20 मध्ये आफ्रिकन युनियनचाही समावेश; पंतप्रधान मोदींकडून 'सबका साथ सबका विकास'चा नारा