एक्स्प्लोर
आता लग्नासाठी बँकेमधून अडीच लाख काढता येणार!

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेकांची लग्न खोळंबली आहेत. मात्र त्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ज्यांच्या घरी लग्न आहे, त्यांना आता बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार आहेत. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर अनेकांची लग्न रखडली आहेत. ऐन लग्नाच्या तोंडावर नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी बँकांच्या बाहेर रांगा लावत आहे. मुलांची लग्न कशी पार पडणार, असा प्रश्न त्यांच्या पालकांना पडला आहे. मात्र यावर सरकारनेच तोडगा काढला आहे. लग्नासाठी अडीच लाख रुपये काढता येणार आहे. मात्र यासाठी लग्नपत्रिका आणि स्वयंघोषणापत्र दाखवणं गरजेचं आहे. तसंच घरातील केवळ एकाच व्यक्तीच्या बँक खात्यातून ही रक्कम काढता येणार आहे. नोटा बदलण्याचा मर्यादा घटवली दरम्यान, आता फक्त दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहे. पैसे बदलण्यासाठीची मर्यादा साडेचार हजारांवरुन 2000 रुपये करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा सरकारने केली आहे. अधिकाधिक लोकांना नोटा बदलता याव्यात म्हणून हा निर्णय घेतल्याचं शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केलं. उद्यापासूनच या निर्णयाची अमंलबजावणी होणार असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना खतं-बियाणं, शेतीसंबंधिच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जाच्या रकमेतून आठवड्याला 25 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय पीकविम्याचा हफ्ता भरण्याच्या मर्यादेत 15 दिवसांनी वाढ करण्यात आल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं.
आणखी वाचा























