First Indian Voter Death : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन, 106 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shyam Saran Negi Death : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार ( First Indian Voter ) श्याम सरण नेगी ( Shyam Saran Negi ) यांचं निधन झालं आहे. ते 106 वर्षांचे होते.
Shyam Saran Negi Death : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार ( First Indian Voter ) श्याम सरण नेगी ( Shyam Saran Negi ) यांचं निधन झालं आहे. देशातील पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांनी 106 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरुवात झाली होती. नेगी यांनी काही दिवसांपूर्वीच आपलं शेवटचं मतदानाचं कर्तव्य बजावलं होतं. हिमाचल प्रदेशच्या ( Himachal Pradesh ) कल्पा ( Kalpa ) गावचे रहिवासी होते. 2 नोव्हेंबरलाच नेगी यांनी पोस्टल मतदान केलं होतं. हिमाचल प्रदेश मध्ये 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक आहे, त्यासाठी त्यांनी शेवटचं मतदान केलं आहे.
श्याम नेगी यांनी 33 वेळा केलं मतदान
स्वतंत्र भारतातील पहिल्या मतदार श्याम सरण नेगी यांचं आज सकाळी निधन झालं. हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील रहिवासी असलेल्या श्याम सरन नेगी यांनी 2 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टल मतदान केलं होतं. त्यांनी आयुष्यात 33 वेळा मतदान केलं. त्यांनी बॅलेट पेपरपासून ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला.
2 नोव्हेंबर रोजी केलं शेवटचं मतदान
देशातील पहिले आणि सर्वात वयस्कर मतदार श्याम सरन नेगी अलिकडेच पोस्टल मतदानासाठीचा 12-डी फॉर्म परत केल्यामुळे प्रसिद्धीझोतात आले होते. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे फॉर्म परत केले होते. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी नेगी यांच्या कल्पा येथील घरी जाऊन पोस्टल मतदान घेतलं. 2 नोव्हेंबर रोजी केलेलं मतदान नेगी यांचं शेवटचं मतदान ठरलं.
श्याम सरण नेगी यांचा जीवनप्रवास
- श्याम सरण नेगी यांचा जन्म 1 जुलै 1917 रोजी किन्नौर जिल्ह्यातील तत्कालीन चिन्नी आणि आताच्या कल्पा या गावात झाला.
- नेगी कल्पा येथील शाळेत शिक्षक होते.
- नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान केले होते.
- अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतलं. परंतु वृद्धापकाळामुळे त्यांना दहावीला प्रवेश मिळाला नाही.
- त्यानंतर नेगी यांनी सुरुवातीला 1940 ते 1946 या काळात वनविभागात वनरक्षक म्हणून काम केले.
- त्यानंतर नेगी शिक्षण विभागात रुजू झाले आणि कल्पा येथील शाळेत शिक्षक झाले.
1951 मध्ये पार पडलं पहिलं मतदान
देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951 साली पार पडली. ही निवडणूक पाच महिने चालली होती. भारताचे पहिले मतदार म्हणून श्याम सरण नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. 1951 मध्ये नेगी यांनी पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीत मतदान केले. यानंतर त्यांनी एकाही निवडणुकीत आपला सहभाग सोडला नाही. मला माझ्या मताचे महत्त्व माहित आहे, असं नेगी सांगायचे. 'शरीर साथ देत नसेल तर स्वबळाच्या जोरावर मला मतदानाला जायचं आहे. या निवडणुकीत माझे हे शेवटचे मतदान असू शकते,' अशी भीतीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज वृद्धापकाळाने आज त्यांचं निधन झालं आहे.