एक्स्प्लोर
शाहीन बागेतील आंदोलकावर तरुणाकडून गोळीबार, जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरु
दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरातील आंदोलकावर गोळीबार झाला आहे. शाहीन बाग परिसरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात धरणं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी आज राजघाटावर एक मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं. त्या मोर्चापूर्वीच हा गोळीबार झाला.

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतल्या जामिया नगरमधील शाहीन बाग परिसरातील सीएए आंदोलकाविरुद्ध एका तरुणाने गोळीबार केल्याचं वृत्त आहे. त्यात एक आंदोलक विद्यार्थी जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज शाहीन बागेतून महात्मा गांधींच्या राजघाट येथील समाधीस्थळी सीएए कायद्याविरोधात एक मोर्चा काढला जाणार होता. अज्ञात तरुणाने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या आंदोलकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. जामिया नगरमधील शाहीन बागेत गेल्या तब्बल 48 दिवसांपासून सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात धरणं आंदोलन सुरु आहे. घटनास्थळावर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या लोकांच्या मते, एक तरुण शाहीन बागेतून मोर्चाची तयारी करणाऱ्या आंदोलकांसमोर आला आणि त्याने सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पिस्तूल रोखून खडसावलं की, "मी तुम्हाला हवं असलेलं स्वातंत्र्य देतो!" अशी फक्त धमकी देऊनच तो थांबला नाही तर त्याने आंदोलकांवर गोळीबारही केला. गोळीबार करणाऱ्या तरुणाला आंदोलकांच्या जवळ उपस्थित असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी अजून त्याची ओळख पटलेली नाही. या गोळीबारात जखमी झालेल्या आंदोलक विद्यार्थ्याच्या हाताला गोळी लागल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी होली फॅमिली परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शाहीन बागेतील आंदोलकांवर गोळीबार होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 15 डिसेंबर रोजी पोलिसांनीच आंदोलकांवर गोळीबार केला होता. मात्र आज पहिल्यांदाच शाहीन बागेतील आंदोलकांवर पोलिसांशिवाय कुणीतरी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित बातमी दिल्लीच्या शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही CAA, NRC विरोधात महिलांचा ठिय्या WEB EXCLUSIVE | CAA, NRC Protest : शाहीन बागच्या आंदोलनाचा ग्राऊंड रिपोर्ट | ABP Mahja
आणखी वाचा























