विदर्भाचा पोट्टा देशात पहिला; शेतकऱ्याच्या मुलास JEE मेन्समध्ये 100 पर्सेंटाईल, फडणवीसांकडून कौतुक
निलकृष्णने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचे अभिनंदन केलं आहे.
मुंबई : स्पर्धा परीक्षांमध्ये ज्याप्रकारे स्पर्धा सुरू आहे, तशीच स्पर्धा आयआयटी (IIT) आणि मेडिकल प्रवेशासाठी सध्या देशभरात पाहायला मिळते. आपल्या मुलाने इंजिनिअर आणि डॉक्टर व्हावं हे, तेही आयआयटी व एम्समधून व्हावं हे स्वप्न देशातील प्रत्येक आई-वडिलांचे असते. मुलांकडून मोठ्या अपेक्षा ठेवत पालक मुलांना क्लासेस व स्वयं अध्ययनाच्या माध्यमातून त्यांची जेईईची (JEE) तयारी करुन घेतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन्समध्ये यंदा एका शेतकऱ्याच्या मुलाने बाजी मारली आहे. नागपुरात (Nagpur) शिक्षण घेत असलेला नीलकृष्णा निर्मलकुमार गजरे हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. मूळचा वाशिम जिल्ह्यातील नीलकृष्णाने परीक्षेत 100 टक्के पर्सेटाईल मिळवत महाराष्ट्रासह नागपूर व वाशिमचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविले.
निलकृष्णने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचे अभिनंदन केलं आहे. नीलकृष्णा हा बेलखेड (ता. मंगरूळपीर) या छोट्याशा खेड्यातील शेतकरी निर्मलकुमार गजरे यांचा मुलगा.''माझं प्राथमिक शिक्षक कारंजा येथे झालं असून माझे वडिल शेतकरी आहेत. वाशिम जिल्ह्यात बेलखेड नावाचं माझं लहानसं गाव आहे. सकाळी 5 तास माझे क्लासेस होते, त्यानंतर 5 ते 6 तास मी दररोज अभ्यास करायचो. मी जो गोल सेट केला होता, त्यानुसार मला यश मिळालं. आता, आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश निश्चित करून, देशासाठी चांगला इंजिनिअर म्हणून काम करायचं'' असल्याचं निलकृष्ण गजरे याने म्हटले आहे. तसेच, परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाला टाटा, बायबाय करायला हवं, असा मोलाचा सल्लाही गजरने दिला आहे. आपल्या आयुष्यात मनोरंजन हेही महत्त्वाचं आहे. पण त्याला किती वेळ द्यायचा हेही आपण ठरवायला हवं. मी अभ्यासावर फोकस केला, पण आठवड्यात एखाचा चित्रपट पाहत होतो, असेही निलकृष्णने म्हटले आहे.
निलकृष्णने अभ्यासासाठी मोठी मेहनत घेऊन स्वत:ला सिद्ध केलं. तर, एका शेतकऱ्याचा मुलगाही देशात अव्वल येऊ शकतो, हेही त्याने दाखवून दिले. त्यामुळे, निलकृष्ण आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रतिनिधित्व करत असून लाखो विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल बनला आहे.
Feather of achievement in Maharashtra's hat..!
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 25, 2024
Heartiest congratulations to Washim & Nagpur's son Nilkrishna Gajare for scoring a flawless 300 in JEE-Main 2024 with an AIR 1 !
Coming from farmer's family and aspiring to pursue engineering to be able to do something for the… pic.twitter.com/nokNMhdGIG
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनीही निलकृष्ण गजरेच्या यशाबद्दल त्याचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. एका शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या निलकृष्णला इंजिनिअर बनून देशासाठी काम करायचं आहे, ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी म्हटले. तसेच, पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.