Farmer Protest : आंदोलक शेतकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक, सुरक्षा जवानांना चिथावणी देण्याचाही प्रयत्न? पोलिसांचा दावा, व्हिडीओ केला शेअर
Farmer Protest : हरियाणा पोलिसांनी शुक्रवारी सोशल मीडिया 'X' वर विविध व्हिडिओ शेअर केले, ज्यांचे वर्णन प्रक्षोभक म्हणून करण्यात आले आहे.
Farmer Protest : पंजाबमधील (Punjab) शेतकऱ्यांनी मंगळवारी (13 फेब्रुवारी) राजधानी दिल्लीकडे (Delhi) मोर्चा सुरू केला होता, परंतु कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे या शेतकऱ्यांना शंभू आणि खनौरी सीमेवरच थांबविण्यात आले. ज्यानंतर शेतकरी केंद्र सरकारकडे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणीच तंबू ठोकून बसले आहेत. हरियाणा पोलिसांकडून 'दिल्ली मार्च'साठी आलेल्या शेतकऱ्यांना सीमेवरच रोखले असून या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तर आंदोलक शेतकरी पोलिसांचा बंदोबस्त तोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, हरियाणा पोलिसांनी शुक्रवारी सोशल मीडिया 'X' वर शेतकरी आंदोलन संदर्भातील विविध व्हिडिओ शेअर केले, ज्यांचे वर्णन प्रक्षोभक म्हणून करण्यात आले आहे.
पंजाब की सीमा से लगते शंभू बॉर्डर पर शांतिपूर्वक प्रदर्शन करने के आश्वासन के बावजूद प्रदर्शनकारियो द्वारा पुलिसकर्मियों को उकसाने के लगातार किए जा रहे प्रयास। हरियाणा पुलिस की अपील-कानून व्यवस्था बनाए रखने में सहयोग करें। @ssk303@cmohry@anilvijminister pic.twitter.com/S7mqKRtk8C
— Haryana Police (@police_haryana) February 16, 2024
"शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या नावाखाली दंगल घडवू नये"
हरियाणा पोलिसांनी शंभू आणि खनौरी सीमेवर थांबलेल्या आंदोलक शेतकऱ्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्या व्हिडिओमध्ये दिल्लीकडे कूच करणारे हे शेतकरी अंबालाजवळील शंभू सीमेवर शेतकरी दगडफेक करताना दिसले. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही पोलिसांकडून करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली दंगल घडवून आणता येणार नाही, असं पोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
पोलीस आणि सुरक्षा जवानांनी शेतकऱ्यांवर बळाचा वापर केल्याचा आरोप
हरियाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या आणि रबराच्या गोळ्या झाडून बळाचा वापर केला, ज्यात अनेक लोक जखमी झाले. असा दावा 'दिल्ली चलो' आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलाय. आधारभूत किंमत (MSP) आणि इतर मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाने 'दिल्ली चलो'ची हाक दिली होती.
चकमकीत सुरक्षा दल तसेच पोलीस जखमी झाल्याचा दावा
हरियाणा पोलिसांनी सोशल मीडियावर आंदोलक शेतकऱ्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ पोस्ट शेअर केले आहेत. या व्हिडीओत चेहरा झाकलेले काही तरुण सुरक्षा जवानांवर दगडफेक करताना दिसले, असा दावा केला जातोय. तर, दुसऱ्या व्हिडिओ पोस्टमध्ये, आंदोलक शेतकरी दगडफेक करण्यासाठी सुरक्षा दलाजवळ येताना दिसत आहेत. या चकमकींमध्ये 25 सुरक्षा कर्मचारी, 18 हरियाणा पोलिस, 7 निमलष्करी दलाचे कर्मचारी जखमी झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
13 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचे 'दिल्ली चलो'
पंजाबमधील शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीपासून दिल्लीकडे मोर्चा सुरू केला होता, परंतु पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांना तेथे थांबविण्यात आले. मात्र, मंगळवारी पंजाबमधील शेतकऱ्यांनी दोन्ही सीमेवर हरियाणा पोलिसांशी झटापट केली आणि बॅरिकेड तोडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचे नळकांडे सोडावे लागले आणि पाण्याच्या तोफांचाही वापर करावा लागला. तर पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या शंभू सीमेवर शांततापूर्ण आंदोलनाचे आश्वासन देऊनही आंदोलकांकडून पोलिसांना चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन हरियाणा पोलिसांकडून देण्यात आले आहे.