Mask Mandatory : महाराष्ट्रात मास्क सक्ती होणार? कोरोना अजूनही संपलेला नाही, 'या' राज्यांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक
Face Mask Mandatory : कर्नाटकनंतर आता केरळमध्येही मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी मास्कसक्ती लागू आहे.
Coronavirus Guildlines : जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला, तरी धोका टळलेला नाही. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता केरळ राज्यामध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाण मास्क घालणे बंधनकारक असेल. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
केरळमध्ये मास्क वापरणे बंधनकारक
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केरळ सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. केरळ सरकारने नागरिकांनी सर्व ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. हा आदेश राज्याच्या सर्व भागात लागू करण्यात आला आहे. केरळ सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि मेळाव्यामध्ये नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. केरळ सरकारने 12 जानेवारी रोजी नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचेही आदेश दिले आहेत. ही मास्कसक्ती 12 फेब्रुवारीपर्यंत लागू करण्यात आली आहे. सध्या केरळमध्ये 2,149 सक्रिय रुग्ण आहेत.
'या' राज्यांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक
केरळ आधी कर्नाटकमध्येही मास्क सक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, शाळा, मॉल, ऑफीसमध्ये मास्क घालणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्यात मास्क सक्ती लागू करण्यात आलेली नाही. पण राज्यातील काही भागांमध्ये मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात मास्कसक्ती लागू आहे. याशिवाय राज्यात मुंबादेवी मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर, अंबाबाई मंदिर आणि महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांना मास्क वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देशात 114 नवे कोरोनाबाधित
भारतात गेल्या 24 तासांत 114 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या 2,119 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. केरळमध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईमध्ये 49 सक्रिय रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये 24 तासांत एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. विमानतळांवर प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात येत असून कोरोना रुग्णांचे जीनोम सिक्वेंसिंगही सुरु आहे.