Electric vehicles | इलेक्ट्रिक कारसाठी आता पार्किंगमध्ये जागा राखीव, दिल्ली सरकारचे नवे धोरण
दिल्लीमध्ये आता इलेक्ट्रिक कार (Electric vehicles) वापरणाऱ्यांसाठी आता पार्किंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्ली : देशात नागरिकांनी इलेक्ट्रिक कारचा वापर करावा यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दिल्ली सरकारच्यावतीनंही आता इलेक्ट्रिक कारच्या वापरासाठी एक नवा नियम करण्यात आला आहे. दिल्लीतील शॉपिंग मॉल्स, हॉस्पिटल्स , हॉटेल्स आणि सरकारी कार्यालये, कॉम्प्लेक्समध्ये आता इलेक्ट्रिक कारच्या पार्किंगसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी 100 हून जास्त गाड्यांच्या पार्किंगची सोय असेल त्याच ठिकाणी हा नियम लागू असेल असं दिल्ली राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दिल्लीचे उर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी 100 पेक्षा जास्त गाड्यांची पार्किंग व्यवस्था असलेल्या ठिकाणी पाच टक्के जागा या इलेक्ट्रिक कारच्या पार्किंगसाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असं केल्याने या वर्षीच्या शेवटपर्यंत दिल्लीत दहा हजाराहून जास्त इलेक्ट्रिक कार चार्जिंग केंद्र उभा राहतील असंही त्यांनी सांगितलं.
येत्या काही वर्षात भारतात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या भारतीय रस्त्यावर धावण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कंपन्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. या इलेक्ट्रिक गाड्यांमुळे देशातील इंधनाच्या वापरात कपात होईल आणि त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन आयात कराव्या लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या भरमसाठ खर्चावर नियंत्रण येईल असा अंदाज बांधला जात आहे. तसेच इलेक्ट्रिक कारच्या निर्मीतीमुळे देशातील प्रदूषणाची समस्याही मोठ्या प्रमाणात निकाली निघेल.
अमेरिकन इलेक्ट्रिक व्हेईकल अँड क्लीन एनर्जी कंपनी टेस्ला 2021 च्या सुरुवातीस भारतात कार्यरत होणार आहे. आणखी बऱ्याच भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल वाहनांवर काम करत आहेत, ज्यांच्या किंमती कमी करता येतील.