(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी: Xiaomi वर ईडीची मोठी कारवाई, 5551 कोटींची मालमत्ता जप्त
Ed Action Against Xiaomi: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi विरोधात मोठी कारवाई केली आहे.
Ed Action Against Xiaomi: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi विरोधात मोठी कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय एजन्सी ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे 5551.27 कोटी रुपये जप्त केले आहेत. Xiaomi India ही चीनमधील Xiaomi समूहाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बँक खात्यांमध्ये असलेली 5,551.27 कोटी रुपयांची रक्कम ईडीने जप्त केली आहे. Xiaomi इंडिया कंपनीने देशाबाहेर बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याच्या आरोपासंदर्भात ईडीने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चौकशी सुरू केली होती.
ED has seized Rs 5551.27 crores of Xiaomi Technology India Private Limited, lying in the bank accounts under the provisions of the Foreign Exchange Management Act, 1999 in connection with the illegal outward remittances made by the company: ED pic.twitter.com/6ZmO9Odltg
— ANI (@ANI) April 30, 2022
Xiaomi India काय आहे ईडीचा आरोप?
ईडीचे म्हणणे आहे की Xiaomi इंडिया कंपनीने 2014 मध्ये भारतात आपले कामकाज सुरू केले आणि 2015 मध्ये पैसे बाहेर पाठवण्यास सुरुवात केली. ईडीने सांगितले की त्यांनी आतापर्यंत परदेशातील तीन संस्थांना 5,551.27 कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले आहे. यात रॉयल्टीच्या नावाखाली Xiaomi ग्रुपच्या युनिटचाही समावेश आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, रॉयल्टीच्या नावावर एवढी मोठी रक्कम Xiaomi India ची मूळ कंपनी Xiaomi ग्रुपच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. ज्या इतर दोन संस्थांना पैसे पाठवले गेले त्या अमेरिकेत आहेत.
ईडीच्या म्हणण्यानुसार, Xiaomi India ने या तीन विदेशी संस्थांकडून अशी कोणतीही सेवा घेतलेली नाही, ज्यासाठी त्यांना इतकी मोठी रक्कम हस्तांतरित करावी लागेल. याचे कारण म्हणजे Xiaomi India पूर्णपणे बनवलेले मोबाईल संच आणि इतर उत्पादने भारतातच खरेदी करते. ईडीने आरोप केला आहे की, Xiaomi India कंपनीने रॉयल्टीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे 5,551.27 कोटी रुपये विदेशात पाठवले, जे परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या कलम 4 चे उल्लंघन आहे. परदेशात पैसे पाठवतानाही कंपनीने बँकांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप आहे.