(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parliament Session: ईडीकडून 'यंग इंडिया'चे कार्यालय सील; संसदेत काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता
Young Indian Office Sealed: नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने यंग इंडियाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईचे पडसाद आज संसदेत उमटण्याची शक्यता आहे.
Young Indian Office Sealed: ईडीने यंग इंडियावर केलेल्या कारवाईचे पडसाद आज संसदेत उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभागृहात एकदा गदारोळ होण्याची शक्यता आहे. ईडीने कारवाई केल्यानंतर काँग्रेस मुख्यालय आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचेही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेस खासदारांची आज संसद परिसरात बैठक पार पडणार आहे.
बुधवारी संध्याकाळी काँग्रेस मुख्यालय आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाजवळ अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. काँग्रेस मुख्यालयाकडे येणारा मार्ग पोलिसांनी बंद केला असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. तर, दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जमू शकतात अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ईडीची कारवाई
नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियाचे कार्यालय सील केले आहे. मंगळवारी ईडीने या कार्यालयाची झडती घेतली होती. त्यानंतर बुधवारी हे कार्यालय सील करण्यात आले आहे. यंग इंडियन कंपनीचे 38 टक्के शेअर्स सोनिया गांधींकडे आहेत आणि तितकेच शेअर्स राहुल गांधींकडे आहेत. यंग इंडिया कंपनीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच एजेएलचे ताबा घेतला होता.
सरकार राजकारण्यांना दहशतवादी मानते का: सिंघवी
काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ''पोलिस कारवाई करून सरकारला जनतेची दिशाभूल करायची आहे. महागाई आणि बेरोजगारी वाहिन्यांवर ठळक बातम्या बनवय नये, अशी सरकारची इच्छा आहे. ते म्हणाले, ''सरकार राजकारण्यांना दहशतवादी मानते का? सत्य बाहेर आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील. लोकशाही मूल्ये जपण्यासाठी काँग्रेस लढत राहील.''