Droupadi Murmu : तीन मुलं डोळ्यादेखत गेली, नंतर पतीही! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं हे दु:ख कशातही मोजता न येणारं...
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी बाजी मारली आहे.
नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना 64 टक्के मतं तर यशवंत सिन्हा यांना 36 टक्के मतं मिळाली. विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी कालच्याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं. त्यानंतर आता द्रौपदी मुर्मू यांनी निवडणुकीत बाजी मारली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं जीवन कमालीचं संघर्षमय आहे. आपल्या जवळच्या माणसांना गमावल्याचं दु:ख त्यांनी अनुभवलं आहे. त्यातून बाहेर येत सामाजिक कार्य, राजकारणाला वाहून घेत आज त्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या.
द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल माहिती
- द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा गावात झाला
- अत्यंत कठीण परिस्थितीत द्रौपदी मुर्मू यांनी रामादेवी महिला कॉलेजमधून डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं
- द्रौपदी मुर्मू यांनी सरकारी नोकरी पत्करली, त्यांनी सिंचन आणि वीज विभागात ज्युनियर असिस्टंट क्लार्क म्हणून रुजू झाल्या
- द्रौपदी मुर्मू यांनी रायरंगपूरच्या श्री अरबिंदो इंटेग्रल एज्युकेशन सेंटरमध्ये मानद शिक्षक म्हणूनही काम केलं
- 1980 मध्ये द्रौपदी मुर्मू यांचा विवाह श्यामचरण मूर्मू यांच्याशी झाला.. हा प्रेमविवाह होता
- लग्नात मुर्मू यांना त्यांच्या आई-वडिलांनी एक बैल, एक गाय आणि 16 जोडी कपडे हुंड्यात/भेट म्हणून दिले होते
- द्रौपदी मुर्मू यांना दोन मुलं आणि दोन मुली अशी अपत्य होती, त्यांचे पतीही सामाजिक कामात अग्रेसर होते
- 1984 साली अवघ्या तीन वर्षाची असताना मुर्मू यांच्या मोठ्या मुलीचा मृत्यू झाला
- ऑक्टोबर 2010 मध्ये मुर्मू यांचा मुलगा लक्ष्मणचा वयाच्या 25 व्या वर्षी अचानक मृत्यू झाला
- जानेवारी 2013 मध्ये मुर्मू यांचा दुसरा मुलगा बिरंची याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला
- ऑक्टोबर 2014 मध्ये मूर्मू यांचे पती श्याम यांचा मृत्यू झाला, तेव्हा ते 55 वर्षांचे होते
- पतीच्या मृत्यूनंतर द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या घराचं रुपांतर शाळेत केलं आणि आपलं आयुष्य सामाजिक कामाला वाहिलं
- 1997 मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला, रायरंगपूर नगर पंचायत निवडणुकीत त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या
- 2000 मध्ये त्यांनी रायरंगपूर विधानसभेची निवडणूक लढवली आणि ओडिशा सरकारमध्ये मंत्री बनल्या
- 2007 मध्ये ओडिशा विधानसभेच्या सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून नीलकंठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं
- त्यांनी परिवहन, वाणिज्य, पशुपालन खात्याचा भार सांभाळला, 2009 मध्ये पुन्हा त्यांनी रायरंगपूरची जागा जिंकली
- द्रौपदी मुर्मू यांनी भाजपाच्या अनुसुचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिलं
- 2013 मध्ये द्रौपदी मुर्मू यांना भाजपनं राष्ट्रीय कार्यकारिणीत एसटी मोर्चाच्या सदस्य म्हणून स्थान दिलं
- द्रौपदी मुर्मू सर्वाधिक काळ राज्यपालपदावर विराजमान राहण्याचाही विक्रम केला, त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या
- झारखंडच्या राज्यपाल असताना त्यांनी जमशेदपूरमध्ये महिला विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले
- द्रौपदी मुर्मू या संपूर्ण शाकाहारी आहेत, त्यांनी राज्यपाल असताना राजभवनात मांस शिजवण्यावर बंदी घातली होती
- देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून त्या विराजमान झाल्या, त्या 64 वर्षांच्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या