एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यस्मरण : जेव्हा कलामांनी मुर्शरफना अर्धा तास लेक्चर दिलं
डॉ. अब्दुल कलाम आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यातला एक किस्सा नेहमी सांगितला जातो. त्यावेळी कलाम यांनी परवेझ मुशर्रफ यांना अर्धा तास लेक्चर दिलं होतं.
मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची तृतीय पुण्यतिथी आहे. 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेल्या कलामांचा प्रवास थक्क करणारा आहे. एका नावाड्याचा मुलगा, वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती अशी वाटचाल अब्दुल कलामांनी केली.
डॉ. अब्दुल कलाम आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यातला एक किस्सा नेहमी सांगितला जातो. कलाम यांनी परवेझ मुशर्रफ यांना अर्धा तास लेक्चर दिलं होतं.
कलाम-मुशर्रफ भेट
जनरल परवेझ मुशर्रफ 2005 मध्ये भारतात आले, त्यावेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचीही भेट घेतली. भेटीच्या एक दिवस आधी कलाम यांचे सचिव पीके नायर भेटीची संक्षिप्त माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे आले.
पीके नायर यांनी सांगितलं की, ''सर उद्या मुशर्रफ तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहेत. कलाम यांनी उत्तर दिलं, ''हो मला माहित आहे.'' यावर नायर म्हणाले, "मुशर्रफ नक्कीच काश्मिरचा मुद्दा उपस्थित करतील. तुम्हाला यासाठी तयार राहायला हवं." कलाम एका क्षणासाठी थांबले, नायरांकडे पाहिलं आणि म्हणाले, "तुम्ही काळजी करु नका. मी व्यवस्थित सांभाळून घेईन."
तीस मिनिटांची भेट
दुसऱ्या दिवशी बरोबर सात वाजून तीस मिनिटांनी परवेझ मुशर्रफ आपल्या ताफ्यासह राष्ट्रपती भवनात पोहचले. त्यांना पहिल्या मजल्यावरील नॉर्थ ड्रॉईंग रुममध्ये नेण्यात आलं.
कलाम यांनी मुशर्रफ यांचं स्वागत केलं. कलाम मुशर्रफांच्या खुर्चीपर्यंत गेले आणि शेजारी बसले. भेटीचा वेळ तीस मिनिटं निश्चित करण्यात आला होता.
कलामांनी बोलण्यास सुरुवात केली, "राष्ट्रपती महोदय, भारतासारखेच तुमच्याकडेही अनेक ग्रामीण भाग असतील. तुम्हाला वाटत नाही का, त्यांच्या विकासासाठी आपल्याला शक्य तितकं करायला हवं?" जनरल मुशर्रफ 'हो' शिवाय आणखी काहीच बोलू शकले नाहीत.
वैज्ञानिकही आणि चतुरही
कलाम यांनी बोलायला सुरुवात केली, "मी तुम्हाला संक्षिप्तपणे 'पुरा' बाबत सांगतो. 'पुरा'चा अर्थ आहे, प्रोव्हायडिंग अर्बन फॅसिलिटीज टू रुरल एरियाज."
कलाम यांनी पुढील 26 मिनिटांपर्यंत मुशर्रफ यांना 'पुरा'चा अर्थ आणि पुढील 20 वर्षांमध्ये दोन्ही देश 'पुरा' कशाप्रकारे लागू करु शकतात, याबाबत लेक्चर दिलं. 30 मिनिटांनंतर मुशर्रफ म्हणाले की, "धन्यवाद राष्ट्रपती महोदय, भारत भाग्यवान आहे, त्यांच्याकडे तुमच्यासारखा एक वैज्ञानिक राष्ट्रपती आहे."
त्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली आणि नायर यांनी त्यांच्या डायरीत लिहिलं की, "कलाम यांनी आज दाखवून दिलं वैज्ञानिकही चतुर असू शकतो."
3 लाख 52 हजार रुपये
मे 2006 मध्ये राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं संपूर्ण कुटुंब त्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आलं होतं. ते एकूण 52 जण होते. त्यांचा 90 वर्षांचा मोठा भाऊ, नातवंडं, पतवंडंही त्यांना भेटण्यासाठी आली होती.
सर्व जण आठ दिवसांपर्यंत राष्ट्रपती भवनात राहिले. अजमेर शरीफला गेले. कलाम यांनी त्यांच्या राहण्याचा संपूर्ण खर्च स्वत:च्या खिशातून केला.
इतकंच नाही तर एका चहाचाही त्यांनी हिशेब ठेवला आणि ते गेल्यानंतर कलाम यांनी स्वत:च्या अकाऊंटमधून 3 लाख 52 हजार रुपयांचा चेक राष्ट्रपती कार्यालयाला पाठवला.
कलाम राष्ट्रपतीपदावर असेपर्यंत ही बाब कोणालाही माहिती नव्हती. मात्र सचिव नायर यांनी अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केलेल्या दिवसांवर पुस्तक लिहिलं, त्यात पहिल्यांदा या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता.
इफ्तारचा पैसा अनाथ आश्रमाला
नोव्हेंबर 2002 मध्ये रमझानच्या महिन्यात कलाम यांनी त्यांच्या सचिवांना बोलावलं. 'आपण इफ्तार पार्टीचं आयोजन का करावं? तसंही इथे आमंत्रित केलेले मान्यवर सुखवस्तू घरातील असतात. तुम्ही इफ्तारवर एवढा खर्च का करता?' असं विचारलं.
कलाम यांनी राष्ट्रपती भवनाच्या अतिथी विभागाच्या प्रमुखांना फोन केला. इफ्तार पार्टीवर जास्तीत जास्त अडीच लाखांचा खर्च येतो, अशी माहिती कलामांनी मिळवली.
"आपण हा पैसा अनाथाश्रमांना देऊ शकत नाही का? तुम्ही अनाथाश्रम निवडा आणि पैसा वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावा." असं कलाम म्हणाले.
राष्ट्रपती भवनातर्फे इफ्तारसाठी निर्धारित असेलेल्या रकमेतून पीठ, डाळ, पांघरुण आणि स्वेटर घेण्यात आले. सर्व वस्तू 28 अनाथाश्रमांमधील मुलांना दिल्या.
पण हा किस्सा इथेच संपला नाही. "तुम्ही हे सामान तर सरकारी पैशांतून खरेदी केलं आहे, यात माझं योगदान काहीच नाही. मी तुम्हाला एक लाख रुपयांचा चेक देतो. त्याचा वापरही इफ्तारसाठी निर्धारित केलेल्या पैशांप्रमाणेच करा आणि कोणाला सांगू नका हे पैसे मी दिले आहेत." असंही कलाम नायर यांना म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
Advertisement