Donald Trump On Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चौफेर घेरलं, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली समोर
Donald Trump On Pahalgam Terror Attack: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला "वाईट हल्ला" असल्याचं म्हटलं आहे. भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना त्यांनी काश्मीरमधील दीर्घकाळापासून असलेल्या तणावाचा उल्लेख केला आहे.

Donald Trump On Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिका सुरुवातीपासूनच भारतासोबत उभा असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम हल्ल्यावर पहिल्यांदाच सार्वजनिकपणे भाष्य केले आहे. ही घटना खूप वाईट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रोम दौऱ्यावर जाताना माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. त्यांना तो आपापसात सोडवावा लागेल. पुढे ते म्हणाले, "मी दोन्ही देशांच्या खूप जवळ आहे, भारत आणि पाकिस्तान, ते दोघेही हजारो वर्षांपासून लढत आहेत, काश्मीरमध्ये हजारो वर्षांपासून युद्ध चालू आहे किंवा कदाचित त्याहूनही जास्त काळ...पण हा दहशतवादी हल्ला खूप वाईट होता", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
एजन्सीनुसार, ट्रम्प म्हणाले, "भारत आणि पाकिस्तान सीमेवर जवळजवळ 1500 वर्षांपासून युद्ध सुरू आहे आणि ते सुरूच आहे. मला आशा आहे की ते एकत्रितपणे यावर तोडगा काढतील. मी दोन्ही देशांना ओळखतो. तिथे खूप तणाव आहे. मला माहिती आहे पण हा तणाव नेहमीच राहिलेला आहे."
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला होता. यानंतर, भारत सरकारने कारवाई करत सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा देखील रद्द केले, इतकेच नाही तर त्यांनी पाकिस्तानसाठी अटारी बॉर्डरचे दरवाजे देखील बंद केले आहे. पाकच्या नागरिकांना देखील त्यांच्या देशात परत जाण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
ट्रम्प यांनी मोदींशी फोनवरून बोलून पूर्ण पाठिंबा दर्शविला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेला वाईट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. एअर फोर्स वनवर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बोलून पूर्ण पाठिंबा दर्शविला. भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी भारत आणि पाकिस्तानच्या खूप जवळ आहे. काश्मीरमधील हा संघर्ष हजारो वर्षांपासून सुरू आहे आणि कालचा हल्ला खूपच वाईट होता.ते पुढे बोलताना म्हणाले, काश्मीर प्रदेशात तणाव जवळजवळ 1500 वर्षांपासून आहे आणि ते दोन्ही देशांच्या नेत्यांना वैयक्तिकरित्या ओळखतात. ट्रम्प यांना आशा आहे की भारत आणि पाकिस्तान आपापल्या पद्धतीने परिस्थिती सोडवतील, जरी त्यांनी हे देखील मान्य केले की ते कायमचे संघर्षाचे क्षेत्र बनले आहे.
#WATCH | On #PahalgamTerroristAttack, US President Donald Trump says, "I am very close to India and I'm very close to Pakistan, and they've had that fight for a thousand years in Kashmir. Kashmir has been going on for a thousand years, probably longer than that. That was a bad… pic.twitter.com/R4Bc25Ar6h
— ANI (@ANI) April 25, 2025
दोन दशकांतील सर्वात घातक हल्ला
मंगळवारी बैसरन व्हॅली येथे, एक लोकप्रिय पर्यटन स्थळ पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला आणि 26 जणांना ठार मारले. गेल्या 20 वर्षातील काश्मीरमधील हा सर्वात घातक दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यामुळे देशात आणि परदेशात तीव्र चिंता आणि संताप निर्माण झाला आहे.
हल्ल्यानंतर भारताची प्रतिक्रिया
हल्ल्यानंतर, भारत सरकारने प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. सरकारने अटारी आयसीपी (इंटिग्रेटेड चेक पोस्ट) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा सवलत योजना स्थगित केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयांमधील अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली. या सर्वांमध्ये, सर्वात मोठा निर्णय म्हणजे 1960 चा सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की आता सिंधू नदीचे कोणतेही पाणी पाकिस्तानला जाऊ दिले जाणार नाही.























