PF Account : नोकरी सोडताना पीएफचे पैसे लगेच काढू नका, तुमचाच तोटा होईल
पाच वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने पीएफ काढला तर करमुक्त असतो. जर ती व्यक्ती पाच वर्षांची सेवा पूर्ण न करता पीएफ काढते तर यामध्ये कर आकारला जातो.
मुंबई : खाजगी क्षेत्रात नोकरी बदलणे खूप सामान्य गोष्ट आहे. परंतु प्रत्येक वेळी जेव्हा आपण नोकरी बदलता तेव्हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढून घेणे योग्य निर्णय नाही. नोकरी बदलताना पीएफचे पैसे काढण्याऐवजी तुमची ईपीएफ आणि कर्मचारी पेन्शन स्कीमचे (ईपीएस) पैसे नव्या पीएफ खात्यात ट्रान्सफर करावे, ते फायदेशीर ठरतं.
जर कॉन्ट्रिब्युशनची पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी जर तुम्ही संपूर्ण पीएफचे पैसे काढून घेतले तर टॅक्सचा फायदा देखील मिळणार नाही. म्हणजेच, पीएफच्या कॉन्ट्रिब्युशनवर प्राप्तिकर कलम 80 सी अंतर्गत देण्यात आलेली कर सूट देखील संपुष्टात येईल. तसेच आपण एका पीएफ खात्यातून दुसर्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर कर सूट कायम राहील. म्हणजेच पाच वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने पीएफ काढला तर करमुक्त असतो. जर ती व्यक्ती पाच वर्षांची सेवा पूर्ण न करता पीएफ काढते तर यामध्ये कर आकारला जातो.
पेन्शन योजनेचं सातत्य टिकवा
नोकरी सोडताना पीएफची संपूर्ण रक्कम काढून घेणे हे तोट्याचे ठरते. यामुळे केवळ चांगल्या भविष्यासाठी होणारी बचत तर नष्ट होते पण पेन्शन योजनेचं सातत्य देखील संपते. तसेच नोकरी सोडल्यानंतरही पीएफवर व्याज मिळते. जर आपल्याला पैशांची गरज नसेल तर आपण पीएफ खात्यातून काही वर्षांसाठी पैसे काढू नका.
PF Balance Check: आपल्या पीएफ खात्याचा बॅलन्स काही मिनिटात चेक करा, 'हे' चार पर्याय वापरा
जर एखादी नोकरी सोडल्यानंतर काही महिन्यांनंतर, आपण दुसरी नोकरी सुरू केली आणि जुन्या कंपनीची संपूर्ण पीएफ रक्कम नवीन कंपनीकडे ट्रान्सफर केली तर तो सेवेचा भाग मानला जाईल. अशा परिस्थितीत पेन्शन योजनेत कोणताही अडथळा येणार नाही. सेवेत सातत्य ठेवण्याच्या तरतुदीखाली असलेल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी समान योगदान देणे आवश्यक आहे.
सलग 30 दिवस बेरोजगार असल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार!
तीन वर्षांपर्यंत व्याज जमा होते
निवृत्तीनंतरही तुम्ही पीएफचे पैसे काढले नाहीत तर व्याज तीन वर्षे सुरुच राहिल. तीन वर्षानंतर हे खातं निष्क्रिय मानलं जातं. बहुतेक लोक पीएफला सुरक्षित भविष्यकालीन निधी म्हणून ठेवतात आणि करमुक्त असल्याने फायदेशीर असते. हा गुंतवणूकीचा एक चांगला पर्याय आहे. अशा परिस्थितीत पीएफ खातं जास्तीत जास्त वेळ सुरु राहणे फायद्याचं ठरतं.