Kanpur Raid: सापडलेला पैसा राजकारण्यांचा आहे का? पियूष जैन पाच कोटींवरुन अडीचशे कोटींचा मालक कसा झाला?
पियूष जैन यांचे बेनामी मालमत्ता प्रकरण आता नवीन वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण याप्रकरणावरुन आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Kanpur Raid : कानपूरमधील अत्तर व्यापारी पियूष जैन यांचे बेनामी मालमत्ता प्रकरण आता नवीन वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण याप्रकरणावरुन आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत पियूष जैन यांच्याकडे तब्बल 250 कोटी रुपयांची रोकड सापडली होती. याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली आहे. पियूष जैन यांच्याकडे मिळालेला पैसा हा राजकारण्यांचा आहे का? पाच कोटी रुपयांची कंपनी असलेला 250 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक कसा झाला? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
कागदपत्रांनुसार, अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या कंपनीची उलाढाल ही 5 कोटींची आहे. 2017-18 मध्ये कंपनीची उलाढाल ही 1 कोटी 70 लाख इतकी होती. पीयूष जैन यांच्या कंपनीत 3 भागीदार आहेत. यामध्ये पीयूष जैन, महेश जैन आणि अंबरीश जैन. या तिघांचा समावेश आहे. या तिघांनी मिळून 1992 मध्ये ओडोकॅम इंडस्ट्रीज ही कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी अलीगढमध्ये आपला आयकर रिटर्न भरते. कागदपत्रांनुसार या कंपनीचे दोन मोठे ग्राहक आहेत. त्यातील एक मुंबईतील तर दुसरा गुटखा कंपनीचा आहे. अद्याप आयकर विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केलेला नाही. अशा स्थितीत तपासात कोणी अडथळा आणतोय का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
चौकशीदरम्यान पियुष जैन यांनी विविध मुद्दे सांगितले आहेत. आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत सापडलेले सर्व पैसे माझे नाहीत, अशी माहिती पियूष जैन यांनी दिल्याची माहिती जीएसटीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जैन यांनी सांगितलेल्या माहितीवरुन या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत संशय देखील व्यक्त केला आहे. याबाबत जीएसटीची टीम जैन यांची आणखी चौकशी करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आयकर विभागाने पियूष जैन यांच्या 16 ठिकाणच्या आलिशान मालमत्तांची कागदपत्रंही जप्त केली आहेत. त्यातल्या 4 प्रॉपर्टीज कानपूरमध्ये, 7 कन्नौजमध्ये, 2 मुंबईत आणि 1 दिल्लीत आहे. विशेष म्हणजे 2 प्रॉपर्टीज दुबईतही असल्याचं समोर आलं आहे. गुरूवारी (23 डिसेंबर) सकाळी पीयूष जैन यांच्या घरी, कारखाना, ऑफिस, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपावर एकाच वेळी आयकर विभागाने छापा टाकला होता. ही कारवाई कानपूर, कन्नौज, गुजरात, मुंबई येथे एकाचवेळी करण्यात आली होती. दरम्यान पीयूष जैन हे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळील आहे. अखिलेश यादव यांच्या उपस्थित त्यांनी एक महिन्यापूर्वी लखनौ येथे समाजवादी नावाचे अत्तर देखील लॉन्च केले होते.
महत्त्वाच्या बातम्या: