(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Heatwave : दिल्लीत विक्रमी तापमानाची नोंद, पारा 49 अंशांच्या पुढे, महाराष्ट्रातही उष्णतेच्या झळा
Heatwave : देशभरात तापमान वाढत असले तरी यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
Heatwave : देशात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. उष्णतेची ही लाट आणखी दोन दिवस कायम राहार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने काल वर्तवला होता. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशातच उष्णतेने नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. परंतु, आज दिल्लीत विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीत कमाल तापमान 49 अंशांच्या पुढे गेले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मुंगेशपूर स्टेशनवर 49.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील विदर्भासह काही भागात काल आणि आज उष्णतेची लाट कायम राहिल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दिल्लीतील नजफगडमध्ये आज 49.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पालम येथे 46.4 अंश, रिज 47.2 अंश, आया नगर 46.8 अंश, जाफरपूर 47.5 अंश, पीतमपुरा 47.3, क्रीडा संकुल 48.4 अंश आणि मयूर विहार 45.5 अंश तापमानाची नोंद झाली. तर दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये तापमान 48 अंशांवर पोहोचले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्ली-एनसीआरच्या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. सोमवारी वादळी पावसाची शक्यता असून, वादळानंतर नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. दिल्लीत आणखी तीन दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडताना काळजी घ्यावी लागणार आहे.
देशभरात तापमान वाढत असले तरी यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे. त्यामुळे वाढत्या तापमानात ही दिलासादायक बाब आहे.
अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 16 मे रोजी द्वीपसमूहात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.