(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fact Check : दिल्लीत खरोखरंच पारा 52.3 अंशावर? IMD ने सांगितली सत्य परिस्थिती
Heatwave in India : सध्या उत्तर भारतात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दिल्लीत तापमानाचा पारा 52.3 अंशावर पोहोचल्याची माहिती होती. याबाबत आयएमडीने आता स्पष्टीकरण दिलं आहे.
नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट (Heatwave in India) पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये सूर्य आग ओकतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, दिल्लीमध्ये भीषण उष्णतेची लाट आली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली येथे 50 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्याची बातमी समोर आली होती. दिल्लीमध्ये तापमानाने 100 वर्षांचा विक्रम मोडीत काढल्याचं सांगितलं जात होतं. बुधवारी दिल्लीत 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याबाबत आता आयएमडीने सत्य परिस्थिती सांगितली आहे. दिल्लीतील तापमानाचं फॅक्ट चेक जाणून घ्या.
उत्तर भारतात सध्या तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. त्यातच दिल्लीत तापमानाचा पार 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आयएमडीने देखील दिल्लीत तापमान 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याची माहिती दिली होती. मात्र, आता आयएमडीने या माहितीवर स्पष्टीकरण देत खरी माहिती दिली आहे.
आयएमडीचं आधीचं ट्वीट
Delhi: The highest temperature of 52.3°C was recorded at Mungeshpur AWS (Automatic weather station): Dr Kuldeep Srivastava, Head, Regional Weather Forecasting Centre, IMD
— ANI (@ANI) May 29, 2024
दिल्लीमध्ये पारा 52.3 अंशावर?
हवामान विभागाने आज दिल्लीसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला होता. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसात रेकॉर्ड ब्रेक गरमी पाहायला मिळत आहे. बुधवारी राजधानी दिल्लीतीन मुंगेशपूर भागात सर्वाधिक 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती आयएमडीने दिली होती. मात्र, आता आयएमडीने सांगितलं आहे की, हा आकडा चुकीचा असून ती सेन्सॉरमधील चूक होती. आयएमडीने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, दिल्लीच्या मुंगेशपूरमध्ये 52.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद "सेन्सरमधील त्रुटी" होती. मुंगेशपूरमध्ये 49.1 अंश सेल्सिअस तापमान होतं, असंही आयएमडीने म्हटलं आहे.
आयएमडीचं आताचं ट्वीट
Record 52.9 degrees Celsius in Delhi's Mungeshpur was "error in sensor": IMD
— ANI Digital (@ani_digital) May 29, 2024
Read @ANI Story | https://t.co/jd07Ywo0dT#IMD #Mungeshpur pic.twitter.com/WsKBmDF9OP
जून महिना दिल्लीकरांसाठी तापदायक ठरणार
केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली आहे, पण दिल्लीला मान्सून दाखल होईपर्यंत संपूर्ण जून महिना निघून जाईल. हा महिना दिल्लीकरांना आणखी रडवणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. दिल्लीतील बहुतांश भागात बुधवारी पारा 45 ते 49 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे. नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद, गुडगावचीही तीच अवस्था आहे. दिल्लीतील तीन भाग सर्वाधिक तापलेले आहेत. मुंगेशपूरमध्ये सोमवारी पारा 48.8 अंशांवर पोहोचला होता.
उष्णतेच्या लाटेमुळे लोक हैराण
दिल्लीमध्ये तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दिल्लीतील तीव्र ऊन, आर्द्रता आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोक हैराण झाले आहेत. ताज्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 11.30 वाजता दिल्लीच्या नरेलामध्ये 47 अंश सेल्सिअस आणि नजफगढमध्ये 46.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दुपारी तीन वाजेपर्यंत पारा 48 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दिवसागणिक दिल्लीचा पारा वाढताना दिसत आहे.
उत्तर भारतात उष्णतेची लाट
उत्तर भारतात जणू आकाशातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत, अशी गरमी जाणवत आहे. दिल्लीतही तापमान 48 अंशांच्या पुढे पोहोचलं आहे. राजस्थानच्या चुरूमध्येही पारा 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. झांशी, यूपीमध्ये दिवसाचे तापमान 49 अंश होते. आग्रामध्ये पारा 48.6 अंशांवर आणि वाराणसीमध्ये 47.6 अंश सेल्सिअस तापमान होते.