Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी पुन्हा संकटात? अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीची ओळख करुन देणं भोवलं, दिल्लीत तक्रार दाखल
Rahul Gandhi : दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अत्याचार झालेल्या मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची ओळख उघड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : दिल्लीत 2021 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर तिची ओळख करुन दिल्यामुळे काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने ही माहिती दिली. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाची ओळख उघड केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींविरोधात हा गुन्हा दाखल केलाय. या संदर्भात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या विरोधात ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामध्ये 6 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सच्या अध्यक्षांनी म्हटलं की, हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना लवकरात लवकरत अटक करण्यात यावी. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आधीच विलंब केला आहे, त्यामुळे आणखी विलंब होऊ नये.
राहुल गांधींनी पोस्ट केली डिलीट
बार आणि बँचने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मकरंद सुरेश म्हाडलेकर यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली. राहुल गांधी यांनी कार्यवाहक सरन्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. तसेच राजकीय फायद्यासाठी राहुल गांधी यांनी ही पोस्ट केली असल्याचा युक्तिवाद म्हाडलेकर यांनी याचिकेत केला होता.
दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद
दरम्यान कोणत्याही खासदाराला दोन वर्षे किंवा अधिक काळाची शिक्षा सुनावल्यास ती खासदारकी रद्द होते. मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणावरुन राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावणी होती. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती. या प्रकरणात देखील 6 महिने ते 2 वर्षे अशी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे या प्रकरणातही जर राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली तर त्यांची खासदारकी पुन्हा एकदा रद्द होण्याची शक्यता आहे.
दिल्ली पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबर 2021 मध्ये, POCSO कायदा आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 23 अंतर्गत गांधींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती, असंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं.