Delhi Coaching Incident: दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये मोठी दुर्घटना; बेसमेंटमध्ये आढळले तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह, दोघांना अटक, नेमकं घडलं काय?
Delhi Coaching Incident: दिल्लीत नुकत्याच झालेल्या पावसानंतर कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी साचलं होतं. पाण्यानं भरलेल्या तळघरात बुडून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Delhi Old Rajender Nagar Incident : नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi News) घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. जुन्या राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या (Coaching Incident) तळघरात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानंतर मृतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे. रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफच्या पथकाचं बचावकार्य सुरू होतं. दिल्ली सरकारनं (Delhi Government) या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दिल्लीत नुकत्याच झालेल्या पावसानंतर कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी साचलं होतं. पाण्यानं भरलेल्या तळघरात बुडून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून तळघरात भरलेलं पाणी पंपांच्या सहाय्यानं काढलं जात आहे.
#WATCH | Old Rajender Nagar Incident | Delhi: Rescue and search operations continue at Delhi's Old Rajender Nagar where three students lost their lives after the basement of a coaching institution was filled with water. pic.twitter.com/fhyaYWwbiG
— ANI (@ANI) July 27, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्यानं तीन विद्यार्थी अडकल्याची माहिती दिल्ली अग्निशमन विभागाला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. सुरुवातीला तळघरात पाणी साचल्यानं दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, तर एक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे संतप्त झालेले विद्यार्थी एमसीडीविरोधात आंदोलन करत आहेत.
दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, आम्हाला संध्याकाळी 7.15 वाजता घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आम्ही पंप लावून पाणी बाहेर काढलं. सुरुवातीला आम्ही दोन विद्यार्थिनींचे मृतदेह बाहेर काढले. एकूण तीन विद्यार्थीनी पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती. सुरुवातीला त्यापैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यानंतर तिसऱ्या विद्यार्थींनीचा शोध घेण्यात आला. घटनेच्या वेळी तळघरात 30 विद्यार्थी होते, त्यापैकी तीन विद्यार्थी पाण्यात अडकले होते.
आतापर्यंत काय-काय घडलं?
- याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासंदर्भात सध्या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
- जुन्या राजेंद्र नगरचे डीसीपी एम. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. पंपाच्या साहाय्यानं पाणी बाहेर काढलं जात आहे. तळघरात अजूनही सुमारे सात फूट पाणी आहे.
- डायव्हर्सना आयएएस संस्थेच्या तळघरातून बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. त्यामुळे मृतांचा आकडा 3 वर पोहोचला आहे.
- डायव्हर्सच्या मदतीनं बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेतला जात आहे.
- दिल्लीचे शिक्षणमंत्री आतिशी यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी 24 तासांत अपघाताचा अहवाल मागवला आहे.
- भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला.
- तळघरात असलेल्या लायब्ररीतून पाणी काढण्यासाठी 2 तास लागतील.
- दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी सांगितले की, नाला/गटार फुटल्यामुळे तळघरात अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी आलं.
- या संपूर्ण प्रकरणात एमसीडी अधिकारी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
राव कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरण्याच्या घटनेवर दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी म्हणाल्या की, अग्निशमन सेवा आणि एनडीआरएफ घटनास्थळी तैनात आहेत. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदारही घटनास्थळी आहेत. मी परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या अपघाताच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघाताला जे कोणी जबाबदार असेल, त्याला सोडलं जाणार नाही.
तळघर दोन ते तीन मिनिटांत पाण्यानं भरलं
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, लायब्ररी 7 वाजण्याच्या सुमारास बंद होते. त्यानंतर सुमारे केवळ 35 मुलं उपस्थित होती. आम्हाला बाहेर पडण्यास सांगण्यात आलं. दरम्यान, सर्व विद्यार्थी तळघरातून बाहेर पडत होते. मात्र पाणी इतक्या वेगानं बेसमेंटमध्ये भरलं की, सर्व विद्यार्थ्यांना झटपट बाहेर पडता आलं नाही. काही विद्यार्थी अडकले आणि दोन ते तीन मिनिटांत संपूर्ण तळघर पाण्यानं भरलं. पावसाचं पाणी इतकं घाण होतं की, खाली काहीच दिसत नव्हतं.
भाजपचा आप आमदारांवर निष्काळजीपणाचा आरोप
दिल्ली भाजपचे माजी सरचिटणीस राजेश भाटिया यांनी या प्रकरणावर आप आमदार दुर्गेश पाठक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी एक व्हिडीओही जारी केला आहे. ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राजेंद्र नगरातील अनेक भागांत पाणी साचलं आहे. याबाबतची तक्रार 'आप'च्या स्थानिक आमदारांकडेही केली होती, मात्र त्यांनी पाणी निचरा करण्यासाठी कोणतंही काम केलेलं नाही.