Delhi Mayor Election : भाजपने शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला, 'आप'च्या शेली ओबेरॉय पुन्हा दिल्लीच्या महापौरपदी विराजमान
Delhi Mayor Election : आम आदमी पक्षाच्या उमेदवार शेली ओबेरॉय आणि मोहम्मद इक्बाल हे दिल्लीचे महापौर आणि उपमहापौर बनले आहेत. भाजपच्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली.
Delhi Mayor Election : आम आदमी पक्षाच्या (Aam Aadami Party) उमेदवार शेली ओबेरॉय (Shelly Oberoi) आणि मोहम्मद इक्बाल (Aaley Mohammad Iqbal) हे दिल्लीचे महापौर (Delhi Mayor) आणि उपमहापौर बनले आहेत. भाजपच्या दोन्ही उमेदवार शिखा राय आणि सोनी पांडे यांनी निवडणुकीच्या अगदी काही काळ आधी अर्ज मागे घेतले. त्यामुळे शेली ओबेराय त्यांची दुसऱ्या वर्षी महापौर म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. आम आदमी पक्ष संविधानानुसार काम करत नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. आमचे सर्व प्रयत्न करुनही आम आदमी पक्ष स्थायी समित्या आणि प्रभाग समित्या स्थापन होऊ देत नसल्याने महापालिकेत कामे होत नाहीत, असा आरोप भाजपने केला..
अरविंद केजरीवाल यांच्याकडून अभिनंदन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेली ओबेरॉय यांचे पुन्हा महापौरपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. " बिनविरोध महापौर आणि उपमहापौर झाल्याबद्दल शेली आणि इक्बाल यांचे अभिनंदन, असं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. "दोघांनाही हार्दिक शुभेच्छा. लोकांच्या आपल्याकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा," असा सल्ला त्यांनी दिला.
Congratulations Shelly and Aley on again becoming Mayor and Dy Mayor, this time unopposed. Best wishes to both. People have huge expectations from us. Work hard to meet their expectations
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 26, 2023
आले मोहम्मद इक्बाल यांना 147 मते मिळाली
दुसरीकडे महापौरपदासह उपमहापौरपदही 'आप'च्या पारड्यात आलं. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत 265 मते पडली. यामध्ये 2 मते अवैध ठरवण्यात आली. उपमहापौरपदासाठी आम आदमी पक्षाचे आले मोहम्मद इक्बाल यांनी 147 मते मिळवून विजय मिळवला. तर भाजपच्या उमेदवार कमल बागडी यांना 116 मते मिळाली.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये महापौरपदाची निवडणूक झाली होती.
याआधी फेब्रुवारीमध्ये महापौर, उपमहापौरपदा प्रथमच निवडणूक झाली होती. त्यानंतर महापौरपदी आम आदमी पक्षाच्या शेली ओबेरॉय आणि उपमहापौरपदी आले मोहम्मद इक्बाल यांनी बाजी मारली. शेली ओबेरॉय यांनी 150 मते मिळवून विजय मिळवला. त्याचा विरोध करत भाजपने रेखा गुप्ता यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 116 मते मिळाली. यावेळी भाजपने शेली ओबेरॉय यांच्याविरोधात शिखा रॉय यांना उमेदवारी दिली. तर उपमहापौरपदासाठी भाजपने सोनी पांडे यांना आपच्या आले मोहम्मद यांच्या विरोधात रिंगणात उतरवलं.
काँग्रेसचा निवडणुकीवर बहिष्कार
आज सकाळी 11.30 च्या सुमारास मतदानाला सुरुवात झाली आणि ते दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललं. दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एकूण 10 नामनिर्देशित खासदार, 14 नामनिर्देशित आमदार आणि 250 निवडून आलेल्या 241 नगरसेवकांनी मतदान केलं. काँग्रेसच्या निवडून आलेल्या 9 नगरसेवकांनी महापौरपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
दोन महिन्यांत दुसऱ्यांदा महापौरपदाची निवडणूक
दरम्यान दोन महिन्यांत दुसऱ्यांदा दिल्ली महापालिका महापौरपदाची निवडणूक पार पडली. डीएमसी कायद्यानुसार हे घडत आहे. डीएमसी कायद्यात दरवर्षी निवडणुका घेण्याची तरतूद आहे. महापौरांचा कार्यकाळ दरवर्षी 31 मार्चला संपतो. नवीन आथिर्क वर्ष सुरु झाल्यानंतर एप्रिलमध्ये नव्या महापौरांची निवडणूक घ्यायची असते.