Delhi Lockdown : राजधानी दिल्लीत लॉकडाऊन वाढवला; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. आता दिल्लीमध्ये 24 मे सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात ही माहिती दिली.
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये लॉकडाऊन एक आठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे. राजधानीत आता 24 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या दरम्यान, निर्बंध शिथील करण्यात आलेले नसून निर्बंध कायम असणार आहेत. अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचा कहर आधीपेक्षा कमी झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 6,500 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
दिल्लीत एका आठवड्यात 2173 रुग्णांचा मृत्यू
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आणि होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या एका आठवड्यात दिल्लीमध्ये 65,180 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी 4 मेपासून प्रति दिन 300 हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. एका दिवसात सर्वाधिक मृत्यू 3 मेरोजी झाले होते. त्यावेळी शहरात 448 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
गेल्या एका आठवड्यात दिल्लीमध्ये 2173 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेनंतर एकूण 21,244 रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या दैनंदिन संख्येत होणाऱ्या वाढीमुळे प्रशासनाने तीन नगरांमधील स्मशान आणि दफनभूमींची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या 24 तासांत देशात 3.62 लाख रुग्ण कोरोनामुक्त; तर 4 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू
भारतात अद्याप कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. दैनंदिन मृतांचा आकडाही चार हजारांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 311,170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,62,437 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
15 मेपर्यंत देशभरात 18 कोटी 22 लाख 20 हजार 164 रुग्णांना कोरोना लस देण्यात आली आहे. तर काल (शनिवार) 17 लाख 33 हजार 232 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 31.48 कोटींहून अधिक रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर काल शनिवारी 18 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्ह रेट 17 टक्के आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :