दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीकडून दिल्लीसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी
Delhi Liquor Policy : दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीनं (ED) दिल्ली-एनसीआरसह देशभरात छापेमारी सुरू केली आहे.
Delhi Liquor Policy : दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील (Liquor Policy) कथित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीनं (ED) दिल्ली-एनसीआरसह देशभरात छापेमारी सुरू केली आहे. देशातील 30 ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. दिल्ली सरकारनं जाहीर केलेल्या अबकारी धोरणावर मोठ्या प्रमाणावर भाजपकडून टीका सुरू होती. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह लखनऊ, गुरुग्राम, चंदिगड, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूमध्ये छापेमारी सुरू आहे.
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात 30 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. ईडीच्या मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सध्या छापे टाकण्यात आलेले नाहीत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह उत्तर प्रदेशातील लखनौ, हरियाणातील गुरुग्राम, चंदीगढ(Chandigarh), मुंबई (Mumbai), हैदराबाद (Hyderabad), बंगळुरूमध्ये (Bangalore) अजूनही छापेमारी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचं पथकं दिल्लीतील जोरबागमध्येही पोहोचली आहे. समीर महेंद्रूच्या मालमत्तांवर ईडीनं छापा टाकला आहे. समीर हे मेसर्स इंडो स्प्रिट्सचे MD आहेत. त्यांनी मेसर्स राधा इंडस्ट्रीजच्या राजेंद्र प्लेस येथील युको बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये ट्रान्सफर केले होते.
आत्तापर्यंतच्या माहितीनुसार, मुळात आज ईडीकडून सीबीआय एफआयआरमध्ये ज्यांची नावे नोंदवली गेली आहेत अशा खासगी व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.
भाजपकडून स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ जारी
आम आदमी पक्षावर निशाणा साधत भाजपनं सोमवारी एका "स्टिंग ऑपरेशन"चा व्हिडिओ जारी केला होता. ज्यामध्ये कथित दारू घोटाळ्यातील आरोपीचे वडील दिल्लीत दारूचा परवाना घेतल्याचा दावा करताना दिसतात. तसेच, त्यासाठी "कमिशन" दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, "नवीन मद्य धोरणामुळे जी लूट झाली होती, ती आज उघड झाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे, 80 टक्के नफा दिल्लीतील जनतेच्या खिशातून काढून मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांनी कमिशनच्या माध्यमातून आपल्या खिशात टाकला."
दुसरीकडे सिसोदिया यांनी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्यावर भाजपचे 'स्टिंग ऑपरेशन' विनोद असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांना या प्रकरणात ‘क्लीन चिट’ दिली आहे, यावरही त्यांनी भर दिला.