(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्लीच्या अंजली अपघातप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, धडकेनंतर कारमधील दोघे जण कारमधून खाली उतरले होते
Kanjhawala Girl Accident : अंजलीच्या स्कूटीला धडक दिल्यानंतर कारमधील दोन आरोपींनी कारमधून खाली उतरून अंजलीला पाहिले होते. अंजली कारमध्ये अकडली आहे हे पाहून देखील त्यांनी 12 किलोमीटर अंजलीला फरफटत नेलं.
Kanjhawala Girl Accident : दिल्लीतील कांजवाला अपघात प्रकरणी रोज नव-नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आता धक्कादायक माहिती समोर आलीय. अंजलीच्या स्कूटीला धडक दिल्यानंतर कारमधील दोन आरोपींनी कारमधून खाली उतरून अंजलीला पाहिले होते. अंजली कारमध्ये अकडली आहे हे पाहून देखील त्यांनी 12 किलोमीटर अंजलीला फरफटत नेलं. त्यामुळे अंजलीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे की, कारने अंजलीच्या स्कूटीला धडक दिल्यानंतर कार थोड्या अंतरावर थांबते आणि दोन लोक त्यातून खाली उतरतात. ते कारच्या खाली पाहतात आणि नंतर कारमध्ये बसतात. त्यानंतर आरोपींनी अंजलीला फरफटत नेलं.
आरोपींना अपघातानंतर 200-300 मीटरच्या आतच अंजली कारमध्ये अडकल्याचे लक्षात आले होते. त्यानंतरही त्यांनी तिला 12 किलोमीटरपेक्षा जास्त फरफटत नेलं. सीसीटीव्ही फुटेजवलून कारमधून खाली उतरून पाहिलेल्या दोघांचीही ओळख पटली असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, पोलिसांनी या दोघांचीही नावे न्यायालयात उघड केली नाहीत. न्यायाधीशांनी त्यांची नावे विचारली असता पोलिसांनी सांगितले की, त्यांची ओळख पटवली आहे, परंतु उघडपणे त्यांची नावे सांगणे योग्य नाही.
पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, "कारमधून खाली उतलेल्या दोघांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीदरम्यान आणखी एक साक्षीदार समोर आला आहे. या साक्षीदाराने त्यांना घटनेच्या 100 मीटर आधी पाहिले होते."
सर्व सीसीटीव्ही फुटेज एकाच वेळी का उपलब्ध होत नाही असा प्रश्न न्यायालयाने पोलिसांना विचारलाय. इतके दिवस होऊनही सीसीटीव्ही फुटेज हाती लागत नाही. शिवाय ते एकाच वेळी का मिळू शकले नाही? संपूर्ण मार्गावर किती सरकारी सीसीटीव्ही कॅमेरे होते? सर्वांचे फुटेज घेण्यात आले होते का?" याप्रकरणी दीपक नावाच्या आरोपीच्या भूमिकेवरही न्यायालयाने पोलिसांचा जबाब मागवला आहे.
या प्रकरणात सोमवारी (9 जानेवारी) सर्व 6 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अंजलीच्या घरात आज चोरी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. अंजलीच्या मृत्यूपासून तिचे कुटुंबीय तिच्या मामाकडे राहतात. याचाच फायदा घेत तिच्या घरातील एलसीडी टीव्हीसह काही वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारलाय.
महत्वाच्या बातम्या