Kanjhawala Case : दिल्लीच्या अंजली अपघातप्रकरणी मोठी अपडेट, 11 पोलिस निलंबित
Kanjhawala Case : दिल्लीच्या अंजली सिंह अपघातप्रकरणी 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका या पोलिसांवर ठेवण्यात आलाय.
Kanjhawala Case : दिल्लीतील कांजवाला प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ज्या मार्गावर ही घटना घडली त्या मार्गावर तैनात असलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्या या पोलिसांमध्ये दोन उपनिरीक्षक, चार सहायक उपनिरीक्षक, चार हेड कॉन्स्टेबल आणि एका कॉन्स्टेबलचा समावेश आहे. निलंबीत पोलिसांपैकी 6 पीसीआर ड्युटीवर तर 5 पोलिस शिपाई तैनात करण्यात आले होते. गृहमंत्रालयाने याबाबतचे आदेश दिले आहेत.
गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणातील पीसीआर व्हॅन, चेक पोस्टच्या पर्यवेक्षक अधिकार्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा झाल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर 11 पोलिस मर्चाऱ्यांच्या निलंबनाचे देखील आदेश दिले आहेत.
Kanjhawala Case : चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई
विशेष आयुक्त शालिनी सिंह यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अपघात घडला त्या रात्री ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून दोषींना शिक्षा करता येईल. तपासात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेण्याचे आणि तपासाच्या प्रगतीबाबत पाक्षिक अहवाल गृह मंत्रालयाला सादर करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत.
राजधानी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी देखील कारवाई केली पाहिजे. जेणेकरून लोक, विशेषतः महिला आणि मुले भयमुक्त वातावरणात जगू शकतील. बाहेरील दिल्लीत ज्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे कमी आहेत आणि ज्या भागात 'स्ट्रीट लाइट' नाहीत अशा भागांचा पोलिसांकडून योग्य तपास केला जाईल. याबरोबरच मृत अंजलीच्या स्कूटीला कारने धडक दिली अशा भागात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ‘स्ट्रीट लाइट’ बसवण्यासाठी पोलिस नागरी संस्थांशी समन्वय साधतील, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
Kanjhawala Case : त्या रात्री काय घडलं?
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अंजली सिंग या मुलीच्या स्कूटीला कारने धडक दिली. या धडकेनंतर आरोपींनी कारमध्ये अडकलेल्या अंजलीला सुमारे 12 किलोमीटर फरफटत नेलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारमधील पाच जणांसह त्यांच्या आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या